नवे चिन्ह मिळताच प्रचाराला सुरुवात; ‘या’ मतदारसंघात झळकले ठाकरे गटाचे बॅनर
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवे चिन्ह मिळताच ठाकरे गटाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे.
मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर आता ठाकरे गटाला शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे तर मशाल हे चिन्ह आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. नवीन चिन्ह मिळाल्यानंतर आपलं चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन्ही गटात स्पर्धा सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. वरळी (Worli) विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या वतीने जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
वरळीत ठाकरे गटाचे पोस्टर
आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये ठाकरे गटाच्या वतीने नवे चिन्ह आणि नावासह पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबतच वरळी मतदारसंघातील इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे देखील फोटो आहेत. युवासेना पदाधिकारी अभिजीत पाटील यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. अंधेरी पूर्व पोट निवडणुकीपूर्वी नवे चिन्ह घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न सध्या दोन्ही गटाकडून सुरू आहे.
सुनावणी लांबण्याची शक्यता
दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता होती. मात्र ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.