महायुतीत धुसफूस, शिंदे-कवाडे युती झाल्याने आठवले गट नाराज, हायकमांडकडे तक्रार करणार?
शिंदे गट हा महायुतीचा भाग असल्याने कवाडे यांच्याशी युती करताना आम्हालाही विश्वासात घ्यायला हवे होते, असे मत रामदास आठवले यांनी मांडले आहे.
मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजपा (BJP) दरम्यान महायुतीत धुसफूस पहायला मिळत आहे. गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदे आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीदरम्यान हातमिळवणी झाली. या पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. मात्र कवाडे-शिंदे युतीमुळे आठवले गट नाराज असल्याची चर्चा आहे.
महायुतीत जोगेंद्र कवाडेंच्या एंट्रीमुळे धुसफूस असल्याचं चित्र आहे. कवाडेंशी युती करताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याची आठवले गटाची खंत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रामदास आठवले लवकरच यासंदर्भात भाजप पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जोगेंद्र कावडे यांनी शिंदे गटाची युती केल्यास आमची हरकत नाही, मात्र कवाडे यांना महायुतीत घेतल्यास आमचा विरोध असेल, अशी भूमिका दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.
कवाडे हे आमचे नेते आहेत. त्यांना माझा वैयक्तिक विरोध नाही. पक्ष म्हणून ते शिवसेनेशी युती करू शकतात. पण महायुतीत हा पक्ष असू नये..
शिंदे गट हा महायुतीचा भाग असल्याने कवाडे यांच्याशी युती करताना आम्हालाही विश्वासात घ्यायला हवे होते, असे मत रामदास आठवले यांनी मांडले होते.
वंचित बहुजन आघाडीतून मोठी बातमी
तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचेने नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात काल मध्यरात्री गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास खलबतं झाली. या चर्चेतून नेमकी कोणती मोठी घडामोड घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला युतीसाठी आवाहन केलं होतं. शिवसेनेनं त्यांना प्रतिसादही दिला होता. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीदरम्यान युतीची चिन्ह असतानाच शिंदेंसोबतच्या या बैठकीनंतर राजकीय चित्र अचानक पालटणार की काय अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
महायुतीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यास उद्धव ठाकरे गटाला हा आणखी मोठा हादरा बसू शकतो.