शिंदे-बोम्मईंना एकाच खोलीत बंद करा, कर्नाटक सीमाप्रश्न सुटेपर्यंत बाहेर काढू नका, कुणी सुचवला अजब उपाय?
केंद्रीय गृमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका खोलीत बंद करावं आणि सीमाप्रश्न सुटेपर्यंत बाहेर येऊ नका, असं सांगितलं तर हे थांबेल, असा उपाय सुचवण्यात आलाय.
नागपूरः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border dispute) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जणू गुंगीचं औषध घेऊन बसलेत अशी जहरी टीका एकिकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prutviraj Chauhan) यांनी अजब उपाय सांगितला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांची या विषय़ी नेमकी काय चर्चा झाली आहे, हे बाहेर आलेले नाही. त्यामुळे सीमाप्रश्न सुटेपर्यंत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकाच खोलीत बंद करा, असा उपाय पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला आहे.
नागपुरात पृथ्वीराज चव्हाण यांनी tv9 च्या प्रतिनिधींशी बातचित केली. ते म्हणाले, ‘ कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. आणि सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या बाजूनं निकाल देईल, अशी भिती कर्नाटक सरकारला आहे. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून भडकाऊ वक्तव्य केले जातात.
कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनात आज सीमाप्रश्नावर महत्त्वाचा ठराव होण्याची शक्यता आहे. त्यावर चव्हाण म्हणाले, ‘ महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, असा ठराव कर्नाटक सरकार करु शकते, आम्ही पण तसा ठरा करु शकतो.
काहीही असले तरी कर्नाटकला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने बोटचेपी भुमिका घेऊ नये. केंद्रीय गृमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका खोलीत बंद करावं आणि सीमाप्रश्न सुटेपर्यंत बाहेर येऊ नका, असं सांगितलं तर हे थांबेल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
गुंगीचं औषध देऊन पाठवलंय?
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची बैठक घेतली होती. बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील उपस्थित होते. मात्र बैठकीत नेमकी काय चर्चा हे अद्याप उघड केले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
दिल्लीतून फडणवीस आणि शिंदे यांना गुंगीचं औषध देऊन पाठवलंय, त्यामुळेच मराठी बांधवांवर अन्याय होताना ते मूग गिळून बसलेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.