वैभव, तू आमच्याकडे ये… शिंदे गटाकडून ठाकरेंच्या आमदाराला जाहीरपणे ऑफर; जुगलबंदीही रंगली
राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. हे अधिवेशन खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच अजितदादा गट आणि शरद पवार गटातील आमदार आमनेसामने येणार आहेत. तर दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदारही आमनेसामने आले आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये विधानभवनासमोरच चांगलीच जुंपली. दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली.
नागपूर | 7 डिसेंबर 2023 : राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. सभागृहात जाण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विधीमंडळाच्या पायरीवर विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. एकीकडे या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. सभागृहात जाण्यापूर्वी हे नेते मीडियाला सामोरे गेले आणि मीडियासमोरच त्यांची मंत्रिपदावरून जुंपली. यावेळी तर शिंदे गटाच्या आमदाराने ठाकरे गटाच्या आमदाराला पक्षप्रवेशाची ऑफरच दिली.
सभागृहात जाण्यापूर्वी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यात चांगलीच जुंपली. मीडियासमोरच त्यांच्यात जुंपली. दोन दिवसांपूर्वी महादेवा मला मंत्री करा, असं साकडं भरत गोगावले यांनी घातलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी गोगावले यांना तुम्ही कोट घाला. मंत्री व्हा, असा चिमटा काढला. तर वैभव, तू आमच्याकडे ये, अशी खुली ऑफरच भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांना दिली.
गोगावले, शिरसाट आणि नाईक… संवाद जसच्या तसा…
भरत गोगावले : अधिवेशन संपता संपता सांगतो तुला. अधिवेशन संपता संपता मी वैभवला सांगतो आणि वैभवची इच्छा असेल तर माझा कोट त्याला देतो. (वैभव नाईकमध्येच बोलू लागतात) कसं आहे. ऐक रे… अरे ऐक ना. एका गोष्टीसाठी मी थांबलोय. पण वैभव आमच्याकडे येत असेल तर त्याच्यासाठीही मी थांबेल.
वैभव नाईक: ही ऑफर कोण देतंय? त्यांना मिळालं नाही, ते देत आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही उठाव केला. तुम्ही दोघं पुढे होता. त्या मानाने तुम्हाला मिळालं नाही. त्याचं दुखं आहे.
संजय शिरसाट : त्यांचा (भरत गोगावले यांचा) व्हीप आम्हाला चालतो. त्यांनी एखादं स्टेटमेंट केलं असेल तर ते आम्हाला लागू होतं. म्हणून बघ तुझी काय इच्छा असेल तर विचार कर बाबा.
नाईक : मंत्रिपद नका मिळू देऊ. पण तुम्ही कोट घाला. म्हणजे भरत शेट वाटाल. मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण आता शेवटचं अधिवेशन आहे.
गोगावले : तुझा सल्ला चांगला असेल तर काही चांगले सल्ले आम्ही घेऊ शकतो. तूही आमचा पूर्वाश्रमीचा मित्र आहेस. तू कोकणातील आहेस. तुझे विचार चांगले आहेत. मला तुझ्याकडून आशा आहे.
नाईक : राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे त्यांचं मंत्रिपद राहिलं. आता बातमी वाचली काँग्रेसचे काही लोक येणार आहेत.
शिरसाट : नार्वेकरांकडे हिअरिंग सुरू आहे. जेव्हा हिअरिंग संपेल, तेव्हा काही लोक डिस्क्वॉलिफाय होणार आहेत. कोण होणार आहेत. हे वरिष्ठ नेते विचार करत असतील. त्यामुळे इन्कमिंग होणार असेल म्हणून विस्तार थांबला असेल. आणि वैभव काहीही झालं तरी आपण एक आहोत लक्षात ठेव. तू मंत्री झाला काय, मी झालो काय आणि भरत झाला काय. आपण आनंद साजरा करू.
नाईक : शेट कोट घाला उद्यापासून.
गोगावले : वैभवचा सल्ला मित्रत्वाचा आहे. त्यात दुसरं काही नाही. भरतशेठची इच्छा पूर्ण व्हावी अनेकांना वाटते. त्यामुळे ते बोलत आहेत. तुम्हीच मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारा. वर्णी लागणार हे पहिल्या दिवसांपासून सांगतो. वैभव मला वैभव देत असेल आणि कोटामुळे मिळणार असेल तर कोट घालायला हरकत नाही.
येथे पाहा व्हिडीओ –