उधारीमुळे पेट्रोल देण्यास नकार, नाईलाजाने मंत्र्याचा बसमधून प्रवास
पुद्दुचेरीचे कृषी मंत्री आर कमलकन्नन (R Kamalakannan) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये ते बसमधून प्रवास करत असताना दिसत आहेत.
पुद्दुचेरी : पुद्दुचेरीचे कृषी मंत्री आर कमलकन्नन (R Kamalakannan) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये ते बसमधून प्रवास करत असताना दिसत आहेत. त्यांच्या गाडीतील पेट्रोल संपलं होतं आणि पेट्रोल पंप धारकाने त्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना बसने प्रवास करावा लागला. आर कमलकन्नन एका महत्त्वाच्या बैठकीला जात असताना हा प्रकार घडला.
रिपोर्ट्सनुसार, शासनाने अनेक काळापासून पेट्रोल पंप धारकाला पैसे दिलेले नव्हते. शासनाकडून उधारी न दिल्याने पेट्रोल पंप धारक नाराज होता. त्यामुळे जेव्हा मंत्री आर कमलकन्नन यांची गाडी त्याच्या पेठ्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेली तेव्हा त्याने पेट्रोल देण्यास नकार दिला.
कृषी मंत्री आर कमलकन्नन यांना एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जायचं होतं. मात्र, पेट्रोल पंप धारक गाडीत पेट्रोल भरण्यास नकार देत असल्याने आर कमलकन्नन यांना उशिर होत होता. त्यामुळे त्यांनी जराही वेळ न घालवता थेट बस पकडली. मंत्र्याला अशा प्रकारे बसमध्ये पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. तर अनेकांनी त्यांच्यासोबत फोटोही काढला, अनेकांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्याही मांडल्या. त्याचवेळी त्यांचा हा व्हिडीओ काढण्यात आला. त्यानंतर मंत्री आर कमलकन्नन यांनी बसचं तिकीट काढलं आणि वेळेत बैठकीला पोहोचले. मात्र, शासनाच्या भोंगळ कारभारामुळे एका मंत्र्यावर आलेल्या या प्रसंगाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.