पुणे | 24 सप्टेंबर 2023 : अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले. आतापर्यंत एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे नेते आता युतीचा आणि सरकारचा भाग झाले. पण यामुळे कोंडी झाली ती अजित पवार गट, भाजप आणि शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांची. इथून मागे ज्या नेत्यांवर टीका केली त्याच नेत्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांना बसावं लागलं. राष्ट्रवादी आणि विशेषत: पवार कुटुंबावर शाब्दिक हल्ला चढवणारे आमदार गोपीचंद पडळकर मागच्या काही दिवसांपासून शांत होते. मात्र आता दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पडळकर पुन्हा चर्चेत आलेत. त्यांनी युती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच थेट निशाणा साधलाय. पडळकरांच्या या टीकेला आता अजित पवारांनीही उत्तर दिलंय.
गोपीचंद पडळकर यांच्या राजकारणाची स्टाईल पाहता ते पवार कुटुंबावर वारंवार टीका करताना दिसतात. आताही त्यांनी असाच निशाणा साधला आहे. अजित पवार यांची आमच्या प्रतिची भावना स्वच्छ नाही. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना मानत नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधला.
युतीचा भाग असणाऱ्या अजित पवारांवर गोपीचंद पडळकरांनी टीका केलीय. त्यांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. हा असं म्हणाला. तो तसं म्हणाला. याला उत्तर देणं माझं काम नाही. हल्ली वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. त्यांच्या वक्तव्यांकडे मी लक्ष देत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. तिथे काहींना भोवळ आल्याच्या घटना समोर आल्या. त्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या कानावर ही बाब पडली. काही भगिनींनीना तिथं भोवळ आली, त्यानंतर तशी परिस्थिती झाली. लालबाग राजाचा देश पातळीवर प्रसिद्ध झालाय, अशातच व्हीआयपी जातात. त्यामुळं सामान्यांना ही तिथं जावंसं वाटतं. हा लालबागचा राजा हा जागरूक गणपती आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं तिथं दर्शनाला मोठी गर्दी होती. व्हीआयपी साठी वेगळी आणि सामान्यांसाठी वेगळी रांग केलेली आहे. तरी ही अशी परिस्थिती उद्भवली. गणेश मंडळांची ही जबाबदारी असते. सरकार म्हणून आमचे पोलीस त्यांना सहकार्य करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.