मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून पुण्यातील आठ विधानसभापैंकी सहा जागांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा वगळता इतर सहा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावेत अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मुंबईत झालेल्या पक्ष बैठकीत पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे जागावाटपांच्या चर्चेला आता सुरुवात झाली आहे.
पुण्यातील हडपसर, खडकवासला, पर्वती,वडगाव शेरी,कोथरुड आणि शिवाजीनगर हे सहा मतदारसंघ आपल्याला मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत, तर आठपैकी 6 मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या जागा आपल्याला मिळाव्या अशी मागणी केली.
2014 ची निवडणूक
दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नव्हती. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही आघाडी तुटली होती. त्यामुळे सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुण्यातील 8 जागांवर सर्व पक्षीय उमेदवार होते. त्यावेळी भाजपने बाजी मारली, मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार 6 मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होते.