पुण्यात भाजपची मदार यंग ब्रिगेडवर, अजित पवारांना टक्कर देण्यासाठी युवा पर्व
दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत भाजपचा कस लागणार आहे. त्यामुळे सत्तांतर होताच भाजपने तरुणांच्या खांद्यावर पदभार सोपवला.
पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर पुणे भाजपने यंग ब्रिगेडवर भर दिला आहे. पुण्याच्या शहराध्यक्षपदी जगदिश मुळिक यांची निवड करण्यात आली आहे. महापौर, सभागृह नेता, स्थायी समितीच्या चाव्याही तरुणांकडे आहेत. तर राज्याचे युवा प्रदेशाध्यक्षही पुण्याचेच आहेत. त्यामुळे अनुभवी चंद्रकांत पाटलांच्या या युवा शिलेदारांचा आता उपमुख्यमंत्री अजित पवारांशी सामना रंगणार (Pune BJP Young Brigade) आहे.
पुणे महापालिकेची सत्ता कायम राखण्याचं मोठा आव्हान भाजपसमोर आहे. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत भाजपचा कस लागणार आहे. त्यामुळे सत्तांतर होताच भाजपने तरुणांच्या खांद्यावर पदभार सोपवला.
जगदीश मुळीक हे वडगाव शेरीचे माजी आमदार. पराभवानंतर त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने ही युवा ब्रिगेड पालिकेत भाजपचा किल्ला लढवत आहे. तर माजी आमदार योगेश टिळेकर हे युवा प्रदेशाध्यक्ष आहेत. अनुभवी चंद्रकांत दादा आणि युवा शिलेदारांच्या जोरावर भाजपाला पालिकेतील सत्ता कायम ठेवायची आहे.
हेही वाचा : अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात, चंद्रकांत पाटलांचे चिमटे
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांकडे सत्तेचं बळ आहे. सत्तेच्या जोरावर पालिका हस्तगत करण्याचा त्यांचा मानस आहे. विधानसभेला शहरातील दोन जागा त्यांनी हस्तगत केल्या, तर एका जागेवर निसटता पराभव झाला. त्याचबरोबर इतर पक्षातूनही आवक सुरु झाली. अजितदादांनी पक्ष संघटनेवरही भर दिला असून भाकरी फिरवली आहे. बैठकांचा सपाटा लावून शहरातील प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यामुळे अजित पवारांचीही कसोटी लागणार आहे.
सरकारने शहराच्या विकासासाठी धडाडीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामुळे राष्ट्रवादीचं संघटन आणि मतदार वाढण्यास नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर दिमतीला रसदही असणार आहे. प्रभाग पद्धत बदलल्यास फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. अशा परिस्थितीत मुरब्बी चंद्रकांत दादा आणि युवा ब्रिगेड कसा डाव टाकतात, यावरच पालिकेत सत्ताकारण अवलंबून (Pune BJP Young Brigade) असेल.