मेधा कुलकर्णी म्हणतात, मनसे प्रवेशाची चर्चा केवळ वावडी, मात्र मनसे नेत्यांकडून स्पष्ट संकेत
पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी मिळणं अशक्य असल्याने मेधा कुलकर्णी मनसेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे
पुणे : कोथरुड मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभेला तिकीट कापल्यानंतर विधानपरिषदेतही उमेदवारी नाकारल्याने मेधा कुलकर्णी गेलं वर्षभर पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र मनसेप्रवेशाच्या बातम्या या निव्वळ अफवा आहेत, असा दावा कुलकर्णींनी केला आहे. (Pune BJP Leader Medha Kulkarni denies joining MNS)
पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी मिळणं अशक्य असल्याने मेधा कुलकर्णी मनसेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनीही मेधा कुलकर्णी यांच्या मनसे प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्यातल्या बदलत्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावल्याची माहिती अजय शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.
विधानसभा निवडणुकीचे तिकीट कापल्यानंतरही मेधा कुलकर्णी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. बरोबर एका वर्षापूर्वी म्हणजे पाच नोव्हेंबर 2019 रोजी ही भेट झाली होती. विधानसभेला भाजपने तिकीट कापल्याचा प्रकार ताजा असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र मेधा कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट ही राजकीय नव्हती, तर मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी होती.
दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी मनसेप्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे. आपण नाराज नसून, पक्षांतराच्या वावड्या उठत असल्याची प्रतिक्रिया कुलकर्णींनी दिली.
मेधा कुलकर्णी कोण आहेत?
मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळवला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं.
विधानपरिषदेचीही उमेदवारी डावलल्याने आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले होते. (Pune BJP Leader Medha Kulkarni denies joining MNS)
मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असं त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी त्यावेळी व्यक्त केली होती.
कोल्हापुरातून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णींना का डावललं? भुजबळांचा चंद्रकांतदादांना चिमटा https://t.co/S4AYJJs0Dh @Medha_kulkarni @ChDadaPatil @ChhaganCBhujbal #Kolhapur
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2020
संबंधित बातम्या :
भाजप नेत्या मेधा कुलकर्णी राज ठाकरेंच्या भेटीला
मेधा कुलकर्णींना पदवीधर मतदारसंघाचे तिकीट तरी देणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात…
भाजपात संघटनात्मक फेरबदलाचे संकेत, मेधा कुलकर्णी, बावनकुळेंना नवी जबाबदारी?
(Pune BJP Leader Medha Kulkarni denies joining MNS)