पुणेः त्या खूप कणखर मनाच्या होत्या. कँसरसारख्या दुर्धर आजाराला त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. त्या नेहमी म्हणायची.. मला आणखी काही वर्ष जगायचंय, पक्षासाठी काम करायचंय… अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी दिली. पुण्यातील भाजप (Pune BJP) आमदार मुक्ता टिळक यांचं गुरुवारी दुःखद निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आयुष्यातील जोडीदार गमावल्यानंतर त्यांच्याबद्दल बोलताना शैलेश टिळक अत्यंत भावूक झाले होते. डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. मागील पाच वर्षांपासून त्यांनी कर्गरोगाशी कशी झुंज दिली, याबद्दल त्यांनी सांगितलं..
शैलेश टिळक म्हणाले, गेली पाच वर्ष कँसरसारख्या दुर्धर आजाराचा अतिशय कणखरपणे त्यांनी सामना केला. परंतु त्यांना यश मिळू शकलं नाही. 2002 ते 2022 अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली.
घरात कोणताही बॅकराऊंड नसताना त्यांनी उत्तम प्रकारे भाजपसाठी काम केलं….
मानसिक कणखरता खूप होती. कायम म्हणत असत.. अजून काही वर्ष जगायचंय .. पक्षानं जी जबाबदारी सोपवली आहे, ती पार पाडायची आहे.
पक्षाप्रती त्यांची निष्ठा शेवटपर्यंत कायम होती. त्यासाठी कोणताही त्रास सोसण्याची त्यांची तयारी होती, अशी प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी दिली.
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी होत्या. तर पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार होत्या.
आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. पुणे महापालिकेत गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या आणि 2017 मध्ये त्यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवले होते. 2019 मध्ये भाजपने कसबा येथील विधानसभा उमेदवारी दिल्यानंतर या निवडणुकीतही त्यांनी विजय संपादन केला.
जून 2022 मध्ये झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला होता. यावेळी आजारपणातही मुक्ता टिळक यांच्याप्रमाणे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुंबईत येऊन मतदान केलं होतं.
त्यावेळेला मुक्ता टिळक कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या साहसाचं आवर्जून कौतुक केलं होतं.