पुणे: माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांचा शुभविवाह नुकताच पार पडला. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातपुते यांच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे आता राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज उपस्थित होते. (BJP MLA Ram Satpute’s marriage will be investigated)
आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिली आहे.
पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात आमदार राम सातपुते यांचा विवाहसोहळा पार पडला. मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची अलोट गर्दी लोटल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती. लग्न सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडाल्याचं दिसून आलं.
सातपुतेंच्या लग्नाला वऱ्हाडी कोण कोण?
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, हर्षवर्धन पाटील, गिरीश बापट, सुभाष देशमुख, निलेश राणे यासारखे भाजपचे दिग्गज नेते लग्नाला उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनीही राम सातपुते यांच्या लग्नाही हजेरी लावली.
सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो उपस्थितांनी शेअर केले. यावेळी राम सातपुतेंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मात्र अनेकांनी लग्नातील गर्दी पाहून नाराजीही व्यक्त केली. सर्वसामान्यांसाठी लग्नाला केवळ 50 पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना लोकप्रतिनिधींनी लग्नाला शेकडोच्या संख्येने गर्दी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. नेते मंडळींनीच करोनाविषयक नियमांना केराची टोपली दाखवल्याने मोठी टीकाही झाली.
संबंधित बातम्या:
भाजपच्या आमदाराला क्वारंटाईन करा, राष्ट्रवादीची मागणी
BJP MLA Ram Satpute’s marriage will be investigated