होळीचा फिवर उतरला, महाराष्ट्र भाजपात वेगवान घडामोडी, पराभव झालेल्या पुण्यात मोठा प्लॅन?
पुण्याला नवीन शहराध्यक्ष मिळणार की भाजपा पुन्हा त्याच नेतृत्वाला संधी देणार, यावरून चर्चा सुरु आहे.
प्रदीप कापसे, पुणे : विदर्भात विधान परिषद निवडणूक आणि कसब्यातील (Kasba) विधानसभा पोट निवडणुकीत (Election) दारूण पराभव झालेल्या भाजापात येत्या काही दिवसात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आगामी मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. दोन दिवस होळी आणि धुळवडीच्या उत्सवात भाजप नेत्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. राज्यातील राजकारणात काही नवी समीकरणं दिसू शकतात, याबद्दल मोठे सूतोवाचदेखील झाले. त्यातच आता पुण्यातील भाजपात सर्वाधिक बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना हटवण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून केली जातेय.
पुण्यात मोठे फेरबदल
कसबा निवडणुकीत सर्वच दिग्गजांना प्रचाराच्या मैदानात उतरवल्यानंतरही भाजपाला हार पत्करावी लागली. यामुळे भाजापचं नेतृत्व आगामी प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकणार असं दिसतंय. पराभवाच्या कारणांवर भाजपात विचारमंथन सुरु आहे. तर या महिनाअखेरीस पुण्यातील भाजपा कार्यकारीणीत बदल होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुण्याला नवीन शहराध्यक्ष मिळणार की भाजपा पुन्हा त्याच नेतृत्वाला संधी देणार, यावरून चर्चा सुरु आहे. भाजापात शहर, जिल्हा कार्यकारिणीची दर तीन वर्षांनी नियुक्ती होते. ही मुदत आता संपली आहे. त्यामुळे महिना अखेरीस पुण्यात नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, गणेश बीडकर, धीरज घाटे आणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नाव चर्चेत आहेत.
नवा शहराध्यक्ष मिळणार?
पुण्यात सध्या जगदीश मुळीक हे शहराध्यक्ष आहेत. मध्यंतरी पुण्यात शहराध्यक्ष बदला अशी मागणीच भाजपच्या माजी नगरसेवकांन केली होती. मात्र कसब्यातील पराभवानंतर भाजपकडून नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता आहे. मुळीक यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी एका गटाने आधीपासूनच लावून धरली आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी सोशल मीडियातूनच ही मागणी केली होती. त्यामुळे भाजपचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. शहराध्यक्ष हटवल्याशिवाय महापालिका जिंकणे अवघड आहे, असा सूर उमटला होता. आता कसब्यातील पराभवानंतर भाजप नेतृत्व यावर गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुण्यातील भाजपात मोठे फेरबदल दिसून येऊ शकतात.
राज्यातही भाजपचे चेहरे बदलणार?
राज्यातील इतर शहरांतील भाजपच्या नेतृत्वातदेखील मोठे बदल होण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. काही ठिकाणचे जिल्हाध्यक्ष बदलतील तर काही ठिकाणचे शहराध्यक्ष बदलतील. योग्य नेत्याकडे योग्य जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.