पदवीधरच्या निकालानं विरोधकांमधील वाचाळवीरांना चपराक, मुख्यमंत्र्यांसह आमची जबाबदारी वाढली- अजित पवार
जित पवार यांनी नाव न घेता भाजपमधील काही मोठ्या नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे. बरेच लोक वाचाळ बडबड करत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय म्हणजे त्या वाचाळविरांना जबरदस्त चपराक असल्याचंही अजितदादा म्हणाले.
पुणे: नागपूर, पुणे आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुणे आणि नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातही राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारानं अभूतपूर्व विजय संपादित केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निकालानं विरोधकांना चपराक बसल्याची टीका भाजपवर केलीय. त्याचबरोबर या विजयानं मुख्यमंत्र्यांसह आमची जबाबदारी वाढली असल्याचंही अजित पवार म्हणाले. (Deputy CM Ajit Pawar on graduate constituency election result)
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांनी गेली कित्येक वर्षे जागा राखली होती. तिथेही महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला. औरंगाबादेतही न भुतो न भविष्य असा विजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा झाला. अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा निवडून आली नाही, याचं दु:ख असल्याचं अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर अजित पवार यांनी नाव न घेता भाजपमधील काही मोठ्या नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे. बरेच लोक वाचाळ बडबड करत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय म्हणजे त्या वाचाळविरांना जबरदस्त चपराक असल्याचंही अजितदादा म्हणाले.
महाविकास आघाडीवर लोकांचा विश्वास- अजितदादा
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निकालावरुन महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील सुशिक्षित वर्ग, पदवीधर आणि शिक्षकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि आमची सर्वांचीच जबाबदारी वाढल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्याचबरोबर एकत्रित येत निवडणूक लढवण्याचं फळ काय असतं, हे देखिल या निवडणुकीतून सिद्ध झाल्याचं अजितदादा म्हणाले.
चंद्रकांत पाटलांना टोला
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यामुळे त्यांचा विजय झाला. एकएकटे निवडणूक लढवून दाखवा मग समजेल, असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. त्यावर विचारलं असता अजित पवार यांनी चंद्रकांत दादांना जोरदार टोला हाणलाय. आम्ही एकटे यायचं की आघाडी करुन यायचं हे आघाडीचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणीही बिनकामाचे सल्ले देण्याची गरज नाही. आमचा पराभव झाला असता तर आम्ही तो मोठ्या मनाने स्वीकारला असता. पण त्यासाठी दिलदारपणा लागतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
संबंधित बातम्या:
आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही : देवेंद्र फडणवीस
पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली; रोहित पवारांचा टोला
‘चंद्रकांत पाटील यांनी आता बोलघेवडेपणा बंद करावा’, विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला
Deputy CM Ajit Pawar on graduate constituency election result