पुणे : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या सोबतच्या आमदारांमध्ये काही नावं ही राष्ट्रवादी पक्षासाठी धक्कादायक होती. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने अनेकांना धक्का बसला. अजित पवार यांच्यासोबत जाण्यामागची कारणं काय होती? हा निर्णय का घेतला? याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, मी केव्हाच पदाची मागणी केली नव्हती. पवारसाहेबांचा फोन आला तेव्हा मला सांगितलं की मंत्रिमंडळात तुला काम करायचं आहे. त्यानंतर वीज खातं हे कुणीतरी शांत डोक्याने सांभाळलं पाहिजे. म्हणून त्यावेळी मी ही जबाबदारी घेतली.
लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून मताधिक्य कमी पडलं. त्यावेळी पक्षाने सांगितलं, राजीनामा द्या मी दिला. पुढच्या मंत्रिमंडळात मला पुन्हा संधी दिली आणि पुन्हा ऊर्जा खातं दिलं. त्यानंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला. आर आर पाटलांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद. तर माझ्याकडे अर्थ खातं आलं. शरद पवारसाहेबांनी दिलेलं पद मी घेतलं आणि काम ही चांगलं करून दाखवलं, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.
मग आम्ही सर्वजण जाऊ ही भूमिका सांगितली. त्यानंतर 54 आमदार पैकी 35 आमदारांनी ही भूमिका घेतली. माझ्या समोर मोठा पेच होता आपण काय करायचं…, असं त्यांनी सांगितलं.
शपधविधी होण्याअगोदर आठ पंधरा दिवस शरद पवारांशी बोलणं झालं होतं. पण त्याचं म्हणणं होतं भाजप सोबत जाऊ नये. शरद पवारांना सोडल्याच्या निर्णयाचं दुःख होत आहे. त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटणार आहे. पक्षाची शिस्त कधी मोडली नाही. साहजिकच सामुदायिकपणाने हा निर्णय घेतला, असं वळसे पाटील म्हणाले.
परत शरद पवार यांच्यासोबत जाणार का, याचा उत्तर आज देता येणार नाही. एकट्याला निर्णय घेता येणार नाही. सगळ्यांनी मिळून सामुदायिक निर्णय दिला तर काही निर्णय होऊ शकतो. पण आज काही उत्तर देता येणार नाही, असं ते म्हणाले.
वळसे पाटील पुढे म्हणाले, मंत्रिमंडळात मी असताना एक प्रस्ताव मांडला होता यात मागणी केली होती की डिंबा धरणाचं पाणी बोगदा करून नगर तालुक्यात न्यायचं. आमचं सरकार गेलं आणि या सरकारने धरणातून बोगदा काढायचा निर्णय घेतला. मागील सरकारमध्ये पावसाचं वाढलेलं पाणी नगरमध्ये द्यायचं असा होता. जेव्हा पाणी कमी पडले तेव्हा आता सरकारने निर्णय घेतला. पावसाचं पाणी बंधाऱ्यात येईल तेवढाच पाणी तालुक्यात द्यायचं.
आता जुन्नर आणि आंबेगावमध्ये ऊस शेती आहे आणि ऊसाला पाणी मिळालं नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येईल. मी हयात भर आमदार राहील किंवा मंत्री राहील हे नक्की नाही. मात्र असे निर्णय झाले तर येथील परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. निर्णय करून घेताना मोठी ताकत सोबत असावी लागते, असंही ते म्हणाले.