उद्या कसाब, याकूब, अफजल गुरु यांना फाशी झाल्याचं पण सांगायचं नाही का? गणशोत्सव देखाव्याच्या वादावरुन आनंद दवे यांचा सवाल
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मग अफजल खान कसा मेला ते तरी सांगा. उद्या कसाब, याकूब, अफजल गुरु यांना फाशी झाल्याचं पण सांगायचं नाही का? असा खोचक सवाल केलाय.
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवा वाद निर्माण झालाय. यंत्रा गणेशोत्सवात (Ganeshotsav) अफजल खान वधाचा देखावा नको, असं पुणे पोलिसांकडून (Pune Police) सांगण्यात आल्यानं गोंधळ निर्माण झालाय. गणेशोत्सवात अफजल खान वधाचा देखावा केल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी परवानी नाकारल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पुण्यातील एक गणेशोत्सव मंडळ अफजल खानाच्या वधाचा देखावा करणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असून पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही आम्ही देखावा करणारच असल्याचं गणेश मंडळाचं म्हणणं आहे. त्यावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी मग अफजल खान कसा मेला ते तरी सांगा. उद्या कसाब, याकूब, अफजल गुरु यांना फाशी झाल्याचं पण सांगायचं नाही का? असा खोचक सवाल केलाय.
‘..मग अफजल खान कसा मेला ते तरी सांगा’
आनंद दवे म्हणाले की, मग अफजल खान कसा मेला ते तरी सांगा. उद्या कसाब, याकूब, अफजल गुरु यांना फाशी झाल्याचं पण सांगायचं नाही का? त्याला मारला आणि कसा मारला हे दाखवलं म्हणून जर कुणाच्या भावना दुखावत असतील तर इतिहास बदलून टाका आणि त्याला मारला नव्हताच तर त्याला आई तुळजाभवानीची मूर्ती फोडल्याचा पश्चाताप झाला आणि स्वत:हून त्याने स्वत:चे आतडं बाहेर काढलं असं सांगून टाका आणि हे सांगायला श्रीमंत कोकाटेसारखे इतिहासकार आहेतच, असा टोलाही दवे यांनी लगावलाय.
इतकंच नाही तर हिंदू महासंघ अफजल वधाचे पोस्टर गणपतीत पुण्यात लावणार, खड्ड्यात गेल्या त्या भावना, असा इशाराही दवे यांनी दिलाय.
अफजल खानचा देखावा करण्यासाठी गणेश मंडळ ठाम
संगम तरुण मंडळाने अफजल खानच्या वधाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी कोथरूड पोलिसांकडे परवानगी मागितली होती. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी परवानगी या देखाव्यासाठी नाकारलीयं. मात्र परवानगी नाकारली तरी देखावा सादर करण्यावर मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे ठाम आहेत. याप्रकरणी गणेश मंडळ थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याची देखील माहिती मिळते आहे.
पुण्यात नऊ गणेशोत्सव मंडळांची एकत्रित आगमन मिरवणूक
पुण्यातील गणेश मंडळांचा आदर्श उपक्रम राहणार आहे. पुणे शहरातील एकूण नऊ सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येणार आहेत. नऊ गणेश मंडळे एकत्रित मिरवणूक काढणार आहेत. गणरायांच्या आगमनाची मिरवणूक शहरातील नऊ गणेश मंडळे एकत्रीतरित्या काढणार असल्याचं यंदाचा गणेशोत्सव खास राहणार आहे. 31 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या दरम्यान निघणार गणेश मंडळांची एकत्र मिरवणूक निघेल. त्यासोबतच एकत्रित येत ही गणेश मंडळे जवळपास 75 सामाजिक उपक्रम राबविणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट पंचकेदार मंदिर साकारणार आहेत. भगवान शिवशंकराच्या निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्री पंचकेदार मंदिर आहे.