‘अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल’, सरनाईक प्रकरणावरुन जयंत पाटलांचं भाजपला प्रत्युत्तर
जयंत पाटील आज मावळमध्ये होते. त्यावेळी त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्यावर भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज्यकीय नेत्यांना त्रास देण्याची भाजपची जुनीच सवय असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
पुणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पण ‘सरनाईकांच्या घरावर टाकलेल्या छाप्यातून काही साध्य होणार नाही. राज्यकीय नेत्यांना अशाप्रकारे त्रास देणं ही भाजपची जुनी सवय आहे. पण असं अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल’, असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. (Jayant Patil on ED action against Pratap Sarnaik and his sons)
जयंत पाटील आज मावळमध्ये होते. त्यावेळी त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्यावर भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज्यकीय नेत्यांना त्रास देण्याची भाजपची जुनीच सवय असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. ‘महाविकास आघाडीचं सरकार पडेल, असं भाजपकडून नेहमीच बोललं जातं. त्यामुळं त्यावर नेहमी प्रतिक्रिया द्यावी, असंही आता वाटत नाही’, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.
‘क्वारंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा’
ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती ईडीला केली आहे. सध्या क्वॉरंटाईन असल्याने चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचं त्यांनी ईडीला कळवल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ईडीने काल मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. आज प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सरनाईक आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरनाईक यांनी ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली असली तरी अजून त्यावर ईडीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ईडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना-भाजप आमनेसामने
सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेना नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘तुम्ही सुरुवात केली, शेवट आम्ही करु’, ‘तुम्ही पत्ते पिसा, डाव आम्ही टाकणार’, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिला आहे. तर चूक नसेल तर चौकशीला घाबरता कशाला? असा सवाल भाजपकडून करण्यात येत आहे. प्रताप सरनाईक हे काही साधूसंत नाहीत, असा टोलाही भाजप नेते नारायण राणे यांनी लगावला आहे.
संबंधित बातम्या:
भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, तुमच्याही चौकशा होऊन जाऊ द्या, संजय राऊतांनी ललकारले
ईडीचं उत्खनन हडप्पा-मोहेंजोदारोपर्यंत, ईडीच्या नोटीसची वाट पाहतोय, संजय राऊतांचा टोला
‘सुडाचे राजकारण असले तरी प्रताप सरनाईकांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे’
Jayant Patil on ED action against Pratap Sarnaik and his sons