चिंचवडमध्ये गुलाल आपलाच म्हणत प्रचाराचा धुराळा, आज दिग्गजांच्या सभांचा धडाका, अखेरच्या टप्प्यात कोण गाजवणार राजकीय मैदान?
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार सभेसाठी दिग्गज नेते प्रचारात होणार सहभागी होणार आहेत.
रणजित जाधव, चिंचवड (पुणे) : पुण्यात कसबा पेठ (Kasaba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने महाविकास आघाडी आणि भाजपतर्फे एकही संधी सोडली जात नाहीये. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रणसंग्रामात उतरले आहेत. एकिकडे राजकीय पक्षांकडून एकानंतर एक दिग्गज नेते मैदानात उतरवले जात आहेत. तर निवडणूक आयोगाचीही जोरदार तयारी सुरु झाली आहे.
आयोगाकडून जय्यत तयारी
येत्या 26 फेब्रुवारी रोजी चिंचवड पोट निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 2 हजार 907 मतदान यंत्रे सीलबंद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान यंत्रे तयार करण्याची आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी 714 कंट्रोल युनिट,1428 बँलेट युनिट आणि 765 व्हीव्हीपँट अशा एकूण 2 हजार 907 मतदान यंत्राचे सिलिंग करण्यात आले.
आचारसंहिता भंगाच्या 59 तक्रारी
आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल या ऑनलाईन अॅपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आचार संहिता लागू झाल्यापासून 59 तक्रारी या ॲपवर आल्या होत्या. या सर्व तक्रारीचे निरसन करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. चिंचवड विधानसभा क्षेत्रात जर आचारसंहिता भंग होत असेल तर ह्या अॅप वर तक्रार करण्याचं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आलंय.
आज कुणाच्या सभा?
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार सभेसाठी दिग्गज नेते प्रचारात होणार सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे,आमदार भास्कर जाधव,रोहित पाटील यांची आज सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा होईल. तर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारसाठी आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत बैठका आणि कोपरा सभा घेणार आहेत. पोटनिवडणुकांच्या प्रचारसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व पक्षाकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे.
पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेही मैदानात
एरवी राज्याच्या राजकारणापासून दूर असलेल्या पंकजा मुंडे यांनाही भाजपने पोट निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे. रविवारी पंकजा मुंडे यांनी पुण्यात जोरदार सभा घेतली. तर त्यांचे बंधू, मोठ्या अपघातातून बचावलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनाही राष्ट्रवादीने प्रचारार्थ मैदानात उतरवले आहेत. परळीत मोठा अपघात झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईत ब्रीजकँडी रुग्णालयात उपचार झाले. काही दिवसांपूर्वीच ते परळीत दाखल झाले. त्यानंतर आता पुण्यात नाना काटे यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील.