चिंचवडमध्ये नाना काटेंच्या कार्यालयाबाहेर एवढा सन्नाटा का? राहुल कलाटेंची बंडखोरी यशस्वी?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान सभेची ही पहिलीच चुरशीची निवडणूक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे.
कृष्णकांत साळगावकर, पुणे : कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकांचा निकाल हळू हळू हाती येतोय तशी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जनतेसमोरची ही परीक्षा आहे. कोण किती पाण्यात आहे, हे या निकालांवरून स्पष्ट होईल. मतमोजणीला सुरुवातदेखील झाली आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये सुरुवातीचे कौल हाती आले आहेत. अशातच चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या कार्यालयाबाहेर अगदीच शुकशुकाट पहायला मिळतोय. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा मोठा फटका नाना काटे यांना बसल्याचं दिसून येतंय.
पहिल्या फेऱ्यांत कोण आघाडीवर?
चिंचवड विधानसभा मतदार संघात राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं होतं. ऐनवेळी राहुल कलाटे यांनी मविआ विरोधात बंडखोरी केल्याने भाजपला अधिक प्रबळपणे डावपेच खेळता आले. कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मविआ उमेदवार नाना काटे यांच्या मतांचं विभाजन झाल्याचं दिसून येतंय.
पहिल्या फेरीत काय चित्र?
चिंचवडमध्ये मतमोजणीच्या 8 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. इथे महाविकास आघाडीच्या नाना काटे यांना 23 हजारांपुढे मतदान आहे. तर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 28 हजारांच्या पुढे आघाडी आहे. बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 10 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाल्याचं दिसून येतंय.
कसब्यात काय घडतंय?
गेल्या 28 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला कसबा पेठ हा यंदा प्रथमच काँग्रेसच्या ताब्यात जाणार की काय असंच चित्र दिसतंय. कसबा विधानसभा जागेवर 20 पैकी 10 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. येथे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. त्यांना 38 हजारांपुढे मतं मिळाली आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना 34 हजारांपुढे मतं आहेत. यंदा प्रथमच उमेदवारीसाठी उभे असलेले हिंदु महासभेचे आनंद दवे यांना 100 मतं मिळाल्याचं सुरुवातीचं चित्र आहे.
महापालिका निवडणुकांची रंगीत तालीम
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान सभेची ही पहिलीच चुरशीची निवडणूक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपला बहुतांश ठिकाणी पराभव पत्करावा लागल्यानेही या निवडणुकांच्या निकालावर राज्यातील जनतेचं लक्ष आहे. तर पुणे शहरासाठी आगामी महानगर पालिकांच्या दृष्टीने ही रंगीत तालीम असल्याचं म्हटलं जातंय. महानगर पालिकांच्या निवडणुकीत तिकिट मिळण्यासाठी इच्छुकांनी अत्यंत उत्साहाने या निवडणुकांत काम करून दाखवलंय. त्यामुळे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठीदेखील ही निवडणूक महत्त्वाची आहे.