पुणे मनसेत काय घडतंय? हकालपट्टीनंतर निलेश माझिरेंचा यू टर्न? म्हणाले, माझा विठ्ठल एकच!
निलेश माझिरे म्हणाले, मला कोणतीही कल्पना न देता जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलं. पक्ष किंवा पक्षप्रमुखावर माझी काहीही नाराजी नाही.
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मनसेच्या पुण्यातील (Pune MNS) माथाडी कामगार सेनेचे ते अध्यक्ष आहेत. सुमारे 400 कार्यकर्त्यांसह त्यांनी सोमवारी मनसेला जय महाराष्ट्र केला. निलेश माझिरे आता पुढची भूमिका काय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र आज टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली. त्यावरून आपल्या निर्णयावरून ते माघारी फिरणार की काय अशी शंका येतेय.
निलेश माझिरे म्हणाले, मला कोणतीही कल्पना न देता जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलं. पक्ष किंवा पक्षप्रमुखावर माझी काहीही नाराजी नाही.
या मुद्द्यावरून मी राज ठाकरेंना भेटणार आहे. जर राज ठाकरेंनी पुन्हा संधी दिली तर पुन्हा काम करणार. मात्र मला राज ठाकरेंना भेटून अडचण सांगायची आहे, असं वक्तव्य निलेश माझिरे यांनी केलंय.
माझा वाद विठ्ठलाशी नाही त्यांच्या भोवतीच्या बडव्यांशी आहे. राज ठाकरे आजही माझे दैवत आहेत, अशी प्रतिक्रिया निलेश माझिरे यांनी दिली.
5 डिसेंबर रोजी निलेश माझिरे यांनी 400 कार्यकर्त्यांसह मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर आता ते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
निलेश माझिरे हे पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आहेत. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हेदेखील पक्षावर नाराज आहेत.
पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे योग्य प्रकारे काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत वसंत मोरे यांनी काल बोलून दाखवली.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तर वसंत मोरे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली होती. मनसेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चिन्ह आहेत.
त्यातच निलेश माझिरे यांच्यावर आधी पक्षातून हकालपट्टीची कारवाई झाली आणि त्यानंतर त्यांनीच 400 कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
राज ठाकरे यांना भेटल्यानंतरच निलेश माझिरे यांची पुढची भूमिका काय असेल, हे स्पष्ट होईल.