राजसाहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल, पुण्यातील मनसे नेत्यांची मागणी
Pune Mahanagarpalika | पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता.
पुणे: महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेतली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका काबीज करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता मनसेच्या गोटातही हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा
गेल्या निवडणुकीत प्रभाग रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.
मनसे पुणे मनपा स्वबळावर लढवणार का?
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करायची की नाही, हा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ, असे सूचक वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकर यांनी केले होते. महापालिका निवडणुकीत मनसे ‘एकला चलो रे’ असणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी फार बोलण्याचे टाळले. त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मोघम वक्तव्य त्यांनी केले. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला होता.
पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप – 99 राष्ट्रवादी – 42 काँग्रेस – 10 सेना – 10 मनसे – 2 एमआयएम – 1 एकूण जागा – 164
संबंधित बातम्या:
VIDEO | जेवणाच्या ताटावरुन उठवलं, आणखी कशावरुन उठवायचं सांगा, राऊतांनी पुन्हा राणेंना डिवचलं
संजय राऊत यांचा बारामतीवर डोळा, म्हणतात ताकद वाढवली पाहिजे, पवारांचा गड भेदण्याची शिवसेनेची तयारी ?
शिवतारेंनी अजित पवारांना ललकारलं, राऊत म्हणाले, त्यांना भेटा, आम्ही तुमच्या पाठिशी!