पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केलाय. पुण्यात काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची स्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, असं अजित पवार म्हणालेत. तसंच त्यांनी काँग्रेसच्या मर्मावरच बोट ठेवलं आहे.
काँग्रेसकडे याआधीपासूनच ही पुण्यातील जागा होती. पण काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही, असं अजित पवार म्हणालेत.
आम्ही बोलून काहीही उपयोग नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून याबाबत निर्णय घेतील. आज काँग्रेसने कितीही काहीही म्हटलं तरी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
एखाद्या मतदारसंघात जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथं जास्त असेल तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे. दुसरकडे जरी अशीच उलट परिस्थिती असेल. तेव्हाही असंच घडलं पाहिजे. जागांची अदलाबदलही करायला हवी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
भाजपचे नेते गिरीश बापट यांचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त झाली. या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीतील कोणता पक्ष उमेदवार देणार हे पाहणं महत्वाचं असेल. अजित पवार यांनी कालही या जागेवर दावा केला होता. तसंच काँग्रेसनेही पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केलाय.
काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केलाय. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचीच जास्त ताकत आहे. शिवाय पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक काँग्रेसच लढवणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार काही हजार मतांनी पराभूत झाले आहेत, असं म्हणत मोहन जोशी यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.