पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागल्यास मविआचा उमेदवार कोण? अजित पवार म्हणाले…
Ajit Pawar on Pune Loksabha By Election 2023 : पुणे लोकसभा पोटनिवडणूक, अन् महाविकास आघाडीचा उमेदवार; अजित पवार काय म्हणाले?
पुणे : भाजपचे नेते गिरीश बापट यांचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक लागणार असल्याचं बोललं जात आहे. अशात जर ही पोटनिवडणूक लागली तर भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असेल? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल? याची सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे पोटनिवडणूकीवर प्रतिक्रिया
पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे. तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. आमच्या मित्र पक्षांना बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या मित्र पक्षाला शुभेच्छा!, असं अजित पवार म्हणालेत.
अजित पवारांचा पुणे दौरा अन् नियोजित कार्यक्रम
शरद पवार आणि अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मुख्य कार्यालयाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर शरद पवार आणि अजित पवारांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. शिवाय चार वाजता शरद पवार साखर संकुलला भेट देणार आहेत. अजित पवार यांनी काही वेळाआधी टिम्बर मार्केटला लागलेल्या आगीच्या ठिकाणाची पाहणी केली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
टिम्बर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करायला आलो होतो. नुकसानग्रस्तांना कशी मदत करता येईल, हे पाहिलं. पीएमसी आयुक्तांच्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशीही बोललो. सोमवारी पुन्हा आढावा घेतील. इन्शुरन्स कंपन्या जे आहे ते देतील. ही जागा भाड्याने दिलेली आहे. व्यापारी म्हणतात आम्हाला घातपात झाल्याची शंका वाटते. मग तशी चौकशी व्हायला हवी. नैसर्गिक घटना झाल्यास मदत करता येते. तशी काही मदत होऊ शकते.तसं मी जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो आहे, असं अजित पवार म्हणालेत.
येत्या निवडणुकांवर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीनं लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर अजित पवार बोलले आहेत. कोण म्हणतंय मी इतके उमेदवार उभे करणार. कोण म्हणताय तितके उमेदवार उभे करणार. कोण म्हणतं एकटं उभं राहणार. आता प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं आहे. पण आगामी निवडणुकीबाबत अजून ठरवायचं आहे, असं अजित पवार म्हणालेत.