पुणे | 30 सप्टेंबर 2023 : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयावर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना आपली भूमिका मांडली होती. हे वक्तव्य आता अजित पवारांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांचं हे वक्तव्य शरद पवार गट आता निवडणूक आयोगाकडे देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्र्वादीच्या पक्ष आणि चिन्हावर शरद पवार आणि अजित पवार गटाने दावा केला आहे. याबाबत येत्या सहा ऑक्टोबरला सुनावणी आहे. त्या पार्शभूमीवर अजित पवार यांचं जुनं वक्तव्य चर्चेत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काही आमदार एका बाजूला गेले आणि त्यांनी म्हटलं पक्ष आमचा तर त्यांना पक्ष किंवा चिन्ह देणं योग्य आहे का?, अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जो व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. त्या व्हीडिओमध्ये अजित पवार असं सांगत आहेत की मनसेचा एक सदस्य गेला तर मनसे पक्ष त्याच्यासोबत जाईल का? तर अजितदादांचं हे विधान योग्यच आहे. अजित पवार नेहमीच खरं आणि योग्य बोलतात. अजित पवारांची भूमिका देखील निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावी, असं जयंत पाटील म्हणालेत. तसंच त्यांनी भाजपच्या स्टॅटर्जीवरही भाष्य केलंय.
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप काही आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा होतेय. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात जे नेते नको वाटतात. त्यांना दिल्लीला पाठवण्याची प्रथा भाजपमध्ये आहे. त्यातलाच हा एक भाग आहे. त्याचमुळे या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत या नेत्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होतेय, असं जयंत पाटील म्हणालेत.
आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय व्हायला हवा. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागतील. या सर्व आमदारांना पैलतीरी पोहोचवण्याचं काम राहुल नार्वेकर करत आहेत. हे ठरवून केलं जात आहे का? राहुल नार्वेकर योग्य तो निर्णय करतील. पण त्यांनी निर्णय लवकर घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे, असंही जयंत पाटील म्हणालेत.
दसरा मेळाव्याच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान उद्धव ठाकरे यांना मिळायला पाहिजे. त्यांची ती परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षांपासून तिथे दसरा मेळावा करतात. सरकार त्यांना नक्की परवानगी देईल असा मला विश्वास आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.