कोरेगाव भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची 3 तास साक्ष नोंदवली; प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले…
Prakash Ambedkar on Bhima Koregoan Case and India Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत जाणार?; प्रकाश आंबेडकर यांनी फॅक्ट सांगितली. भीमा कोरेगाव प्रकरणी आणि पंकजा मुंडेंच्या ‘शिवशक्ती दर्शन’ दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलंय.
पुणे | 30 ऑगस्ट 2023 : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी महत्त्वाची साक्ष नोंदवली गेली. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली गेली. कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2018 ला हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनाही हजर राहण्याचे आयोगाने आदेश होते. तर विश्वास नांगरे पाटील यांचीही आयोगासमोर उलटतपासणी पूर्ण झाली आहे. साक्ष दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यांमाना प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. तसंच इतरही विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.
कोरागाव भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची तीन तास साक्ष नोंदवण्यात आली. आज अनेक कागदपत्र भिमा कोरेगाव बद्दल आयोगाला सादर केले. पोलिसांना मिळालेले इनपुट मुख्यमंत्री यांच्यापर्यंत गेले का? 1 तारखेला म्हणजेच ज्या वेळी दंगल झाली. तेव्हा देवेंद्र फडणवीस नगरमध्ये होते. त्यांचं हेलिकॉप्टर टेक ऑफ किती वाजता झालं? याची नोंद आहे फडणवीस यांना दंगली संदर्भात माहिती मिळाली नाही का? माहिती होती तर मग ती दाबून ठेवली होती का? असा प्रश्न देखील उपस्थितीत झाला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
देशातील प्रमुख विरोधी पक्षांची मुंबईत बैठक होते आहे. या बैठकील राजकीय पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. अशात या बैठकीला वंचितला निमंत्रण देण्यात आलं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आम्ही शिवसेना ठाकरे गटाबरोबर आहोत. आता आम्हाला निमंत्रण दिलं का नाही हे काँग्रेसला विचारावं लागेल. 2019 मध्ये काँग्रेसला ऑफर दिली होती. काँग्रेस आमंत्रण देत नाही म्हणून आमची आघाडी झाली नाही. आमचे वकील उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी भूमिका या बैठकीत मांडली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पुन्हा राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्या पुढचे 11 दिवस ‘शिवशक्ती दर्शन’ दौरा करणार आहेत. त्यावर आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या सध्या दौरा करत आहेत. मंदिरात जात आहेत. तिथे त्यांना आशीर्वाद मिळो अशी अपेक्षा करतो, असं आंबेडकरांनी म्हटलं.