पुणे : शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. यात 2019 नंतरचा जो कालखंड आहे. यात 2019 नंतर राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलांवर भाष्य करण्यात आलं आहे. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 25 नोव्हेंबर 2019 ला देखील एक मोठा गौप्यस्फोट याबाबतीत झाला होता, जो अजित पवारांनी केला होता. त्यांनी केलेला गुप्तस्फोट आणि आज पुस्तकातून झालेला गौप्यस्फोट हा परस्परविरोधी आहे. त्यामुळे लोकांनी ठरवावं की, काय खरं आणि काय खोटं?, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या याबद्दल मी अधिक काहीच बोलणार नाही. मला फारशी काही माहिती नाहीये. राज्यात नक्की दोन राजकीय स्फोट होतील, वाट बघत बसा, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार स्टेबल आहे. राज्यातलं सरकार अस्थिर नाही. राजकीय अस्थिरता ही राजकीय पक्षांमध्ये आणि सरकारमध्ये नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
शरद पवारांनी पुस्तक ज्या हाताने लिहिलं त्याच हाताने उद्धव ठाकरे यांना हाताला धरून मंत्रालयात नेलं असतं तर बरं झालं असतं. आज ही परिस्थिती नसती, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.
मी उद्धव ठाकरे सत्तेमध्ये असतानाच बोललो होतो की, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जायला हवं होतं. मातोश्री हे लोकांना आदरणीय आहे. पण उद्धव ठाकरेंनी सचिवालयात गेलेच पाहिजे होतं. ही माझी भूमिका होती आजही ठाम आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाश सोहळ्यात शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहेत. कुठे थांबायचं हे मला कळतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी त्यांना विनंती केली आहे. जयंत पाटील यांनीही राजीनामा मागे घेण्याती शरद पवार यांना विनंती केली. यावेळी जयंत पाटील भावूक झाले. जयंत पाटील यांच्यासोबतच जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, फौजिया खान यांच्यासह अन्य नेत्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.