रस्त्यावर खड्डे, ट्रॅफिक आणि कसली टोल वसुली करताय?; टोलनाक्याच्या प्रश्नावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक
Raj Thackeray on Road Potholes Traffic : तुम्ही भाजपसोबत जाणार का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले...
पुणे | 26 जुलै 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आज राज ठाकरे पुण्यात असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा विविध मु्द्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. त्याचवेळी त्यांनी टोलनाक्यांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडली. रस्त्यावर खड्डे आणि ट्रॅफिक जाम होत असताना टोल कसला वसूल करता, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मनसे पक्ष कार्यालयात मनसेची बैठक पार पाडली. या दोन दिवसात राज ठाकरे पुणे शहरातील सर्व विभाग अध्यक्षांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मला टोलबद्दल लोकांची भूमिका कळली पाहिजे. त्यानुसार पुढे बघेन. सगळे निरडवलेले आणि निर्लज्ज आहेत. याला जबाबदार आपला समाज आहे. त्यामुळे त्यांना कळले की काही केलं तरी हे लोक आम्हाला मतदान करणार आहेत. लोकांनी आता मनावर घेतलं पाहिजे. मतदान करताना विचार केला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
तुम्ही भाजपसोबत जाणार का? असा सवाल विचारल्यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. शहरातील कामा संदर्भात आढावा घेतला. कोणी कोणाला भेटला की युती होत नसतात. भाजपसोबत जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार भाजपसोबत गेले. राष्ट्रवादीची पहिली टीम गेली आहे. ही सगळी मिलीभगत आहे.अजूनही होर्डिंगवर शरद पवारांचा फोटो आहे. जिथे लक्ष देण्याची गरज आहे तिथे सरकार लक्ष देत नाही आणि पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करणार म्हणतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी आज विभाग अध्यक्षांची बैठक घेतली आहे. या बैठकीला पुणे शहरातील आठही विभागाचे विभागाध्यक्ष उपस्थित होते. अर्धा तास राज ठाकरे यांनी विभाग अध्यक्षांशी चर्चा केली. लोकांपर्यंत पोहोचा. आपल्या पक्षाच्या योजना आणि पक्षाची उपक्रम लोकांपर्यंत घेऊन जा, अशा सूचना राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.