“उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसून होते, आता तरण्याताठ्या गड्यासारखं फिरतायेत, कुठं गेलं मणक्याचं दुखणं?”
Shahajibapu Patil on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ, आताच्या ठिकठिकाणच्या सभा अन् आजारपण; शहाजीबापू पाटील यांचा ठाकरेंना सवाल, संजय राऊतांवर टीकास्त्र
पुणे : शिवसेनेचे नेते, आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय. उद्धव ठाकरे यांना काय झालं होतं? अडीच वर्षे घरात बसून होते. तरणाताठा गडी असल्यासारखं आता फिरतायेत. नुसतं धडाधडा लावलंय आता कुठं गेला मणका आणि मणक्याचं दुखणं?, अस सवाल शहाजीबापू पाटील यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत, अशी टीका भाजप आणि शिवसेना वारंवार करते त्यावरही शहाजीबापूंनी आज पुन्हा एकदा टीका केली आहे.
अजित पवारांवर टीका
अजित पवार मुख्यमंत्रिपदाचं बाशिंग घेऊन फिरतायेत. पण नवरी काय मिळायला तयार नाही, असा टोलाही शहाजीबापूंनी लगावला आहे.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे फिरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की तुमचा रूपया मी बघितला नाही. शिंदेसाहेबांची नियत साफ आहे, असंही शहाजीबापू म्हणाले आहेत.
कर्नाटकात निवडणूक पार पडतेय. कर्नाटकमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. तर भाजपचा दारूण पराभव झालाय. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तर काँग्रेसचं कौतुक केलं आहे. यावर शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निकाल कर्नाटकाचा आणि संजय राऊत उड्या मारतंय इकडून तिकडं… पोरगं कुठं झाल आणि बारशं कुठं घालायचं चाललंय… , असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
आम्ही बाजीगर आहोत दबंग आहोत. महेश शिंदे, शंभूराजे देसाई पहिल्या तडाख्यातले गडी आहेत. आम्ही जातानाच आमदारकी सोडून गेलो होतो. त्यामुळे आम्हाला मोह नाही, असंही ते म्हणालेत.
मला आता दिवसांत 200 फोन येत असतात. या डोंगर झाडीनं मला एवढं काम लावलंय, अशी मिश्किल टिपण्णीही शहाजीबापूंनी केली आहे.
ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आतापर्यंत 69 कोटी निधी दिला. आता आणखी 150 कोटी निधी मिळेल, असंही ते म्हणालेत.