महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं…
Sharad Pawar on Mahavikas Aghadi : कर्नाटक निवडणूक अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका; शरद पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया
पुणे : लोक माझे सांगाती पुस्ताकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मग शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आणि आणि पुन्हा एकदा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद स्विकारलं. या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर शरद पवार यांनी पहिल्यांदा टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. त्यांनी राजीनाम्यापासून ते कर्नाटक निवडणुकीवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री कोण?
ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे नाना पटोले यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. मात्र याबाबत महाविकास आघाडीत कुठलीही चर्चा झाली नाहीये. महाविकास आघाडीच्या बाबतीत जी चर्चा केली जातेय ती संपली आहे. लवकरच आम्ही महाविकास आघाडीचे सर्व सहकारी एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा?
शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं. त्यावर शरद पवार बोलते झाले. “आता सांगता येत नाही.पण जबाबदारी घेण्याची पण तयारी पाहिजे. सुप्रिया सुळेंचे सध्या बारामतीवर लक्ष आहे. निवडणूक संपल्यावर शांतपणे निर्णय घेऊ”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी अभेद्य
राष्ट्रवादीत कसलीही अस्वस्थता नाहीये. इतरांचं माहीत नाहीये. पण आमचे सहकारी आणि राष्ट्रवादी पक्ष अभेद्य आहे. अजित पवारांच्या बाबतीत सुरू असलेल्या चर्चाना काही आधार आहे का? उगीच एखाद्याच्या बाबतीत गैरसमज निर्माण केला जात आहे, असं शरद पवार म्हणालेत.
कर्नाटक निवडणूक
कर्नाटकात सध्या निवडणूक होतेय. तिथं प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बली की जय म्हणत मतदान करा, असं म्हटलं. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन अशा पद्धतीने घोषणा देतात हे योग्य नाहीये, असं शरद पवार म्हणाले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असं सध्या दिसत आहे. केरळ, तेलंगणा, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, बंगालमध्ये या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. जास्तीत जास्त 5 ते 6 राज्यात भाजपची सत्ता आहे. बाकीच्या सगळ्या ठिकाणी नॉन भाजप सरकार आहेत. लोकसभेत काय होईल हे माहीत नाही कारण लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील का माहीत नाही, असं शरद पवार म्हणालेत.