पुणे | 17 जुलै 2023 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. अशात स्थानिक पक्षांना सोबत घेण्यावर भाजपचा जोर कायम दिसतो. अशात आता वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या तोंडावर भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
आधी एकनाथ शिंदे यांना भाजपने आपल्यासोबत घेतलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर आता अजित पवार भाजपसोबत गेले आहेत. त्यानंतर वंचित आणि भाजपची युती होणार का? हा प्रश्न चर्चेत आहे. अशात या सगळ्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्ही भाजपसोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता, वंचित बहुजन आघाडी भाजपबरोबर जाणार नाही. भविष्यात पुढे कोणाबरोबर जाऊ माहिती नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
भीमा कोरेगाव चौकशी आयोग, जुनी जिल्हापरिषद इमारतीमध्ये साक्ष नोंदवली जात आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील चौकशी आयोगात साक्ष नोंदवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आले आहेत. आज त्यांची चौकशी झाली. यावेळी तत्कालीन पोलीस अधिकारी सुवेज हक हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासोबत एक चर्चा झाली. याबाबत कारवाई सुरू आहे. मी काही मुद्दे उपस्थिती केले आहेत. तसंच या मुद्द्यांची चौकशी करायला सांगितली आहे. कोर्टाने लेखी प्रतिज्ञापत्र स्वरूपात सादर करावं असं सांगितलं आहे. 24 तारखेला मी प्रतिज्ञापत्र सादर करेल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. या सरकारला शेतकऱ्यांचं काही देणं-घेणं नाही. काल झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वात शेवटी होते. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. याची माहिती या सरकारला आहे का? हे केवळ खिशे भरू सरकार आहे, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या बंडावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. दरवर्षी दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र असतं. त्याचा धागा धरत आंबेडकरांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. यंदा अजित पवारांना दिवाळी एकट्याला साजरी करावी लागेल असं वाटतंय. पुढच्या वर्षी तरी कुटुंबासोबत दिवाळी करतील, अशी आहे, असं ते म्हणालेत.