2024 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ!; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान
Prakash Ambedkar on PM Narendra Modi : शरद पवार आणि अजित पवार या दोघांवरही माझा विश्वास नाही; प्रकाश आंबेडकर यांची कालच्या गुप्त बैठकीवर प्रतिक्रिया, शरद पवार आणि अजित पवार भेटीवरही भाष्य, म्हणाले माझा विश्वास...
पुणे | 13 ऑगस्ट 2023 : 2024 ची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात अनेक दावेप्रतिदावे केले जात आहेत. विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही पुन्हा बहुमताने सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केला. आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 2024 मध्ये सरकार कुणाचं येईल हे आता सांगता येत नाही. पण 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. हे नक्की सांगतो. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. विरोधकांच्या INDIA आघाडीवरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, बीआरएस हे पक्ष वेगळे राहतील. जगनमोहन रेड्डी हेही वेगळेच राहतील, असं वाटतं. हे नेते त्यांच्या राज्यात स्ट्राँग नेते आहेत. देशातील अनेक नेते आपल्या आपल्या भागातून पुढे येत आहेत. हे सगळे आपली आपली भुमिका मांडतील, असंही आंबेडकर म्हणालेत.
नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणावर बोलताना आंबेडकरांनी टीका केली. भाषणात नरेंद्र मोदींचा कॉन्फिडन्स लूज दिसला. त्यांनी ओढून तोडून ते भाषण केलं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
नवाब मलिक यांना नुकतंच जामीन मंजूर झाला आहे. मलिक यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला आहे. कोर्टाने सांगितलं आहे की त्या बेसेसवरच जमीन दिला आहे. त्यात शंका घेण्यासारख काही नाही, असंही आंबेडकर म्हणालेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल पुण्यात भेट झाली. यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांचे नातेवाईक भगवंत पाटील यांना ED ची नोटीस आली आहे. या संदर्भातील ती बैठक होती. या बैठकीत काय ठरलं हे माहिती नाही. माझा शरद पवार आणि अजित पवार कुणावरच विश्वास नाही, असं आंबेडकर म्हणालेत.
भाजपला देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? धर्मावर आधारित फाळणी भाजपला करायची आहे. कावळ्याला कितीही धुतला तरी तो काळाच राहील. तुमच्या आरएसएसचा इतिहास कधीच बदलणार नाही. 10950 पासून तिरंगा हा सगळ्यांच्या घरात फडकतो. त्यामुळे हर घर तिरंगा पेक्षा हा आरएसएसच्या लोकांच्या घरात फिरवला पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.