बाळासाहेब थोरात यांना भाजापाची ऑफर देणार का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच म्हणाले…
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत.
प्रदीप कापसे, पुणेः बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्या वादानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) भूकंप झाला आहे. थोरात यांच्या बंडाला आता शिवसेनेनंही पाठिंबा दिल्याचं चित्र आहे. थोरात-पटोले वादात भाजपाचा फायदा होऊ नये, असा इशारा शिवसेनेचं मुखपत्र सामनातून देण्यात आलाय. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला आता भाजपात प्रवेशाची ऑफर मिळते का, आणि मिळाली तर थोरात ती स्वीकारणार का… याकडे सर्वांचं लागलंय.पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीच्या भाजप प्रचाराचा नारळ आज फुटला. या प्रसंगी उपस्थित भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थोरातांना भाजपाच्या ऑफरविषयी वक्तव्य केलंय.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
भाजप पदयात्रेत सहभागी झालेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसमधील वादाचा आम्ही फायदा घेणार नाहीत. बाळासाहेब थोरात यांना आम्ही आमच्या रस्त्यावर आणणार नाहीत. त्यांनी कुठे जायचंय, हा निर्णय त्यांनी स्वतःच घ्यायचा आहे. पण काँग्रेस आता अधःपतनाला लागली आहे. महात्मा गांधी यांची काँग्रेस विसर्जित होण्याच्या मार्गावर आहे, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.
मुंबई तोडण्याची हिंमत…
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदे घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई तोडण्याचा भाजपाचा अजेंडा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदा भावनेवर आधारीत असतात. मुंबई तोडणार, असा लोकांमध्ये फक्त भ्रम निर्माण केला जात आहे. पण प्रत्यक्षात मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापामध्ये नाही.. असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.
शिवसेन आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून सर्वकाही निसटलंय, त्यामुळे ते अशी निराशाजनक वक्तव्ये करतात, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
अजित पवार काँग्रेसच्या उमेदवाराची खात्री देणार?
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसचीही साथ होती, असे म्हटले जात आहे. आता थोरात-पटोले वाद विकोपाला गेल्यानंतर अजित पवार पुण्यात काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची हमी घेणार का, असा प्रश्न विचारला जातोय. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अजित पवार असं म्हणणार नाहीत. कारण दोन्ही ठिकाणी आमचेच उमेदवार विजयी होतील. भाजपा गरीबांसाठी मैदानात उतरला आहे.
कसबा पेठेत प्रचाराचा नारळ फुटला…
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजप नेते हेमंत रासणे विरुद्ध काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढाई होण्याची शक्यता आहे. आज हेमंत रासणे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. भाजपने केसरीवाड्यातून प्रचारासाठी प्रचार यात्रा काढली. यावेळी सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.