“भाजपमध्ये येण्यासाठी रांग लागलीये, पण देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय, नो रुम अॅव्हेलेबल!”
Pune News : काँग्रेसच्या नेत्यांशी आमच्या भेटी-चर्चा, काँग्रेसच्या एका तरी नेत्यानं श्वासापर्यंत मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही; भाजप नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
पुणे | 05 ऑगस्ट 2023 : आधी शिवसेनेतील शिंदे गट फुटला अन् भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं. मग राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते आणि तत्कालिन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेही सरकारमध्ये सामील झाले. या पाठोपाठ काँग्रेसचे नेतेही भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होतेय. यावर भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपमध्ये येण्यासाठी रांगा लागल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. शिवाय काँग्रेसचे नेत आमच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षात येण्यासाठी रांग लागली आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावला आहे की, नो रुम अॅव्हेलेबल!, हाऊसफुल्ल आहे, असं मुनगंटीवार म्हणालेत.
काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी बोलणं झालं आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात. काँग्रेसच्या एका नेत्यानं सांगावं की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असं चॅलेंजच मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडलेला आहे. त्यावर बोलताना हा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा फिजिक्सच्या विषयाला केमिस्ट्रीचा पेपर कसा येईल?, असं मुनगंटीवार म्हणाले. मी अजून मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला नाही. मी माझ्या खात्याचं काम करतोय, अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या काळात ठाकरेंनी फक्त घोषणा केली. मात्र महायुतीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत. हे खरं आहे की काही शेतकऱ्यांना अजून मदत मिळणं बाकी आहे. पण आम्ही ती लवकरच देऊ.सगळं राज्य चालवायचं आहे. त्याचं आर्थिक गणित आहे, असं म्हणत बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांना परिवारवादाची ती व्याख्या वाटत असेल पण आम्हाला तो परिवादच वाटतो. 105 आमदार जरी असले तरी 43 चं मंत्री होणार आहेत. तुम्हाला भाजप अजून समजलीच नाही, असं म्हणत शरद पवार यांच्या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे.
आपला देश अर्थव्यवस्थेत प्रगती करतोय.आज आपली पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आली आहे. जर्मनी आणि जपान हे दोन्ही देश आपल्यामागे जाऊ शकतात. यामध्ये राज्याचा वाटाही खूप मोठा आहे, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.