हा वैयक्तिक कार्यक्रम होता की देशाचा? विरोधी पक्षातील नेत्यांना का बोलावलं नाही?; सुप्रिया सुळे यांचा मोदी सरकारला सवाल
Supriya Sule on New Parliament Building Inauguration : संसद भवनाची कोणती इमारत अधिक प्रिय, जुनी की नवी?; सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं...
पुणे : आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन होतंय. आज सकाळी सर्व धर्मीयांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पूजा करण्यात आली. सेंगोलची स्थापना करण्यात आली. आता थोड्याच वेळात दुपारी 12 वाजता संसद भवनाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमावरही त्यांनी भाष्य केलंय.
आम्हाला 3 दिवसांपूर्वी कमिटी मेंबर म्हणून मेसेज आला. लोकसभा, संसद आमच्यासाठी मंदिर आहे. संसदेची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. एरवी बिल पास करायचे असतात तेव्हा मंत्री विरोधी पक्षातील नेत्यांना फोन करतात. मग जर सरकारने आता संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना फोन केला असता तर सगळे गेले असते. हा कार्यक्रम कोणा एका व्यक्तीचा आहे का? , असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
देशाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा दिवस आहे. विरोधीपक्ष जर नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना बोलवायला हवं होतं. जे विरोधी पक्षातील काही खासदार या कार्यक्रमाला गेले आहेत ते नेमके कसे गेलेत तेही पाहणं महत्वाचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
लोकशाहीचे मंदिर माझ्यासाठी जुनी बिल्डिंग आहे. लोकसभेच्या अध्यक्षांना बोलावलं गेलं मग राज्यसभेच्या सभापतींना का बोलावलं नाही? ओम बिर्ला यांनी बोलावले त्यांचं स्वागतच पण उपराष्ट्रपती यांना बोलवायला हव होतं, असंही त्या म्हणाल्यात.
कोणती इमारत अधिक प्रिय?
संसदेची कोणती इमारत तुम्हाला अधिक प्रिय आहे? असं विचारण्यात आलं. तेव्हा जुनी वास्तू मला प्रिय आहे. त्या भिंती बोलक्या आहेत. कारण मोठमोठ्या लोकांनी इथंच बसून काम केलं आहे. देशाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय याच संसदेत घेण्यात आले आहेत. या जुन्या इमारतीशी माझं भावनिक नातं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दर रविवारी मी माझ्या मतदारसंघात असते. मला ते ‘मन की बात’बद्दल काही माहिती नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मन की बात कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजून लोकसभा पोटनिवडणूक लागली नाही . महाविकास आघाडी एक सक्षम उमेदवार देईल आणि तो उमेदवार पुणेकरांची सेवा करणारा असेल, असं म्हणत त्यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय.