देवेंद्रजी, गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून ‘या’ प्रश्नांची उत्तरं द्या- सुषमा अंधारे
Sushma Andhare on Devendra Fadnavis : गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून 'या' प्रश्नांची उत्तरं द्या, कारण...; सुषमा अंधारे यांच्याकडून फडणवीसांना सवाल
पुणे : शिवसेना नेते, आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले आहेत. “मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढलंय. देवेंद्र फडणवीस संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील. त्यांनी वकील म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत”, असं अंधारे म्हणाल्या आहेत.
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारची बाजू घेतील. पण म्हणून मी वकील म्हणून त्यांना प्रश्न विचारते आहे. त्यांनी वकील म्हणून उत्तरं द्यावीत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
या प्रकरणातील सर्व उत्तर फडवीसांनी दिली पाहिजेत. तानाजी सावंतजी नाकाने वांग सोलू नका. हा फक्त ट्रेलर आहे. मी माझी लढाई चालूच ठेवणार आहे. प्रसंगी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन लढाई चालू ठेवणार, असं सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं. गेली 8- 10 दिवस मी ब्रेक घेतला होता. त्यामुळं या दिवसात काय घडलं ते माहिती नाही. तानाजी सावंतावर नंतर सविस्तर बोलीन. मी असभ्य लोकांशी बोलत नाही, असं म्हणत तानाजी सावंत यांना उत्तर देणं त्यांनी टाळलं.
देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलतेय. फडणवीस आपण गृहमंत्री आहात, संजय सिरसाट प्रकरणात जी चौकशी समिती नेमली त्याबद्दल काय माहिती आहे का? काल त्या छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रकरणात त्या आमदाराने मला क्लीन चिट दिलीय असं सांगितलंय. ही क्लीन चीट कशी दिली गेली, याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
महिलांना ट्रोल करण्यात त्यांना फार मोठी मर्दगिरी वाटते. फडणवीससाहेब तुम्ही त्यांना कायं समज द्याल का? गृहमंत्री म्हणून तुम्हीच उत्तर दिली पाहिजेत. सगळे संजय राऊतांना का घेरत आहेत, सुमार दर्जाचे लोकं त्यांच्याबद्दल बोलतायत. हे योग्य नाही. याला आळा घातला गेला पाहिजे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे यांच्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे आज समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आज त्या पत्रकार परिषदेत रडल्या. तरी मला आश्चर्य वाटणार नाही. त्या चांगल्या अॅक्टर आहेत. हा अहवाल कोर्टात जाईल तेव्हा त्यांनी बाजू मांडावी, असं शिरसाट म्हणालेत.