योगेश बोरसे, पुणेः विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) दारूण पराभव झाल्यानंतर भाजप आता ताकही फुंकून पिणार असल्याचं म्हटलं जातंय. पुण्यातील कसबा पेठ (Kasba) आणि चिंचवड (Pimpari Chinchwad) विधानसभा पोट निवडणुकीचा उमेदवार निवडताना भाजप कार्यकारिणीच्या अनेक बैठका पार पडल्या. अनेक पैलू खंगाळून पाहिल्यानंतर आज अखेर भाजपने कसबा आणि चिंचवड येथील उमेदवारांची नावं जाहीर केली. कसबा पेठची जागा भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झाली होती. येथे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपने कसब्यातून हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवडमधून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
चिंचवडमधून अश्विनी जगताप हा घरातीलच उमेदवार दिला आहे . तर कसब्यातून समोर आलेलं नवं नाव हेमंत रासणे हे नेमके कोण आहेत? यावरून चर्चा सुरु झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासणे थेट दगडू शेठ गणपतीच्या दर्शनासाठी गेले. सच्चे गणेशभक्त म्हणून ते लोकप्रिय आहेत.
भाजपाने विधानसभा निवडणुकीची संधी दिली आहे. या संधीचं मी सोनं करून दाखवणार. कसबा पेठ पोटनिवडणूकित मी विक्रमी मतांनी निवडून येणार.. अशी प्रतिक्रिया हेमंत रासणे यांनी दिली आहे. एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाने मला उमेदवारी दिली त्याचं मी सोनं करून दाखवेन.. आम्हाला रणनीती करण्याची गरज नाही, सर्वसामान्य नागरिकांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. नगरसेवक आणि त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मी कसब्यात काम केलं आहे, त्याला जनता आशीर्वाद देईल, अशी प्रतिक्रिया हेमंत रासणे यांनी दिली आहे.
हेमंत रासणे यांना भाजपने तिकिट द्यायचं ठरवल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं. यावरून कुणाचीही नाराजी नसल्याचं ते म्हणाले. मात्र मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. एवढ्या आजारपणातही मुक्ता टिळक यांनी पक्षासाठी काम केलं. त्यांच्या कामावर अन्याय झाल्याची भावना शैलेश टिळक यांनी बोलून दाखवली. ही प्रतिक्रिया देताना ते भावूक झाले होते. मात्र अखेरीस पक्षाला साथ देणार असल्याचं त्यांनी कबूल केलं.