पुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज
पुण्यातील एका 28 वर्षीय इंजिनिअर तरुणाने थेट काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President) अर्ज केला आहे. गजानंद होसाळे (Gajanand Hosale) असं या तरुणाचं नाव आहे.
पुणे : पुण्यातील एका 28 वर्षीय इंजिनिअर तरुणाने थेट काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President) अर्ज केला आहे. गजानंद होसाळे (Gajanand Hosale) असं या तरुणाचं नाव आहे. गजानंद हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून, त्याला काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) जबाबदारी सांभाळायची आहे. गजानंद होसाळे सध्या एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांच्या समन्वयाने देशाची वाटचाल करण्याचा त्याचा मानस आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून ते पद रिकामं आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. प्रचंड विरोधानंतरही राहुल गांधी आपल्या पद सोडण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. इतकेच नाही तर त्यांनी तातडीने नवा अध्यक्ष नेमण्याचीही विनंती पक्षाला केली.
या सर्व पार्श्वभूमीनंतर पुण्यातील गजानंद होसाळे या इंजिनिअरने काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. गजानंद उद्या काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे आपला अर्ज देणार आहे. गजानंद अद्याप काँग्रेसचा प्राथमिक सदस्यही नाही. मात्र लवकरच तो ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे. काँग्रेसला तरुण नेतृत्वाची गरज आहे, त्यामुळे मी अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याचं गजानंदने म्हटलं आहे.
राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची निवड करायची या संभ्रमावस्थेत सध्या काँग्रेस आहे. त्यामुळेच मी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहे, असं गजानंदने सांगितलं.
“सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचं पुनरुज्जीवन गरजेचं आहे. त्यासाठीच पक्षाला तरुण नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधींनीही पक्षाला तरुण नेत्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मला वाटतं काँग्रेसला केवळ वयाने तरुण असलेल्या अध्यक्षाची नव्हे तर मन आणि विचारानेही तरुण असणाऱ्या अध्यक्षाची गरज आहे”, असं गजानंदने नमूद केलं.
सध्या काँग्रेसचं अध्यक्षपद रिकामं असल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामुळे तर पक्षाची पडझड आणखी होत असल्याचं गजानंदने सांगितलं.
दरम्यान, गजानंदला आधी तू सदस्य म्हणून पक्षात सहभागी होऊन काम का करु शकत नाहीस याबाबत विचारलं असता, तो म्हणाला, “जर मी सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करु लागलो तर माझी दखल घेतली जाणार नाही”.
अध्यक्ष म्हणून पारदर्शकता आणि संधी देण्याला मी महत्त्व देईन. माझ्याकडे विकासाची ब्लूप्रिंट आहे, त्यामुळे सध्याच्या काळात काँग्रेसला मी नवसंजीवनी देऊ शकेन, असा विश्वास गजानंदने व्यक्त केला.
कोण आहे गजानंद होसाळे?
- गजानंद होसाळे हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे.
- गजानंदने कर्नाटकातील बिदर येथून इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे.
- सध्या तो पुण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत.
- कुटुंबासह गजानन भोसरीत राहतो.
- होसाळे कुटुंबाची कर्नाटकात कोरडवाहू शेती आहे.
- महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांच्या समन्वयाने देशाची वाटचाल करण्याचा त्यांचा मानस आहे.