अहमदनगर : “केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?”, असा जळजळीत सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. (Radhakrishna Vikhe patil Attacked Thackeray Government) महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होतं का?, असा सवाल करत तुम्ही सर्व तत्व पायदळी तुडवून सत्ता स्थापन केलीये. तर मग सत्ता टिकवण्याचे तुमचे काम आहे, असं विखे म्हणाले.
केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे असा प्रकार आहे. तुम्ही राज्यातील जनतेसाठी स्वत: काय करणार, हे आधी राज्यातील जनतेला सांगा, असं विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एक हाती सत्तेच्या आव्हानावरुन शरद पवारांनी स्पष्ट केलं की मी हे 30 वर्षापासून ऐकतोय. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारमध्ये जो बेबनाव तयार होत चाललाय त्याचं हे उदाहरण असल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला. दुर्दैवाने सरकारकडे नियोजन नाही तर फक्त सत्ता टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची कसरत चाललीये, असं विखे म्हणाले.
“सरकारच्या अजेंड्यावर सामान्य माणूस आहे ना शेतकरी… फक्त मुठभर लोकांसाठी सत्ता टिकवण्याची धडपड महाराष्ट्रात सुरु आहेत. बहुतेक मंत्र्यांचे लक्ष आपल्या विभागातील बदल्यांकडे आहे. राज्याच्या अर्थकारणापेक्षा बदल्यांचे अर्थकारण यांना महत्वाचे वाटतंय”, अशी टीका त्यांनी केली.
मंदिर उघडण्यावरून विखे पाटलांनी राज्य सरकारला अनेक सवाल उपस्थित केले. “मला आश्चर्य वाटतं, सरकार मंदिर उघडायला का घाबरतंय? यांना परमेश्वराची एवढी भीती का वाटते?”, असा सवाल त्यांनी सरकारला केला. “प्रत्येकाचे दैवत आहे. सर्व धर्मांना आपलं स्वातंत्र्य आहे. तुम्ही मदिरालय उघडाला परवानगी दिली मात्र, मंदिर उघडायला परवानगी देत नाही. त्या त्या भागातील अर्थशास्त्र मंदिरावरती अवलंबून आहे. हा भावनिक मुद्दा नसून अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय उध्वस्त झालेत. तुम्ही सर्वार्थाने विचार केला पाहिजे, अन्यथा सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल”, असा इशारा विखेंनी दिला.
“अतिवृष्टीनंतर सरकारला उशिरा जाग आलीये. संपूर्ण शेतकरी उध्वस्त झाल्यानंतर आज सरकार त्यांना मदत करायला निघाले आहे. परंतू सरकारची मदत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतीये का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांनी शेतीमाल पाण्यात उभा राहून काढला तर काहींचा वाया गेला, हे पंचनामे करताना लक्षात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुमचे निर्णय होईपर्यंत पीक तसेच ठेवायचे का?”, असा सवाल त्यांनी केलाय.
(Radhakrishna Vikhe patil Attacked Thackeray Government)
संबंधित बातम्या
‘सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं?’, राधाकृष्ण विखे पाटलांचा शिवसेनेवर निशाणा
इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे