सुजय विखेंकडून लवकरच वडिलांनाही भाजपात आणण्याचे संकेत
अहमदनगर : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पदाचा राजीनामा दिलाय, पण त्यांनी अजून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं यामुळे बदलणार आहेत. त्यामुळे आता विखेंच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागलंय. भाजपवासी झालेले त्यांचे पुत्र सुजय विखे यांनीही […]
अहमदनगर : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पदाचा राजीनामा दिलाय, पण त्यांनी अजून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं यामुळे बदलणार आहेत. त्यामुळे आता विखेंच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागलंय. भाजपवासी झालेले त्यांचे पुत्र सुजय विखे यांनीही वडिलांना भाजपात आणण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनी राजीनामा देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धक्का दिलाय. अशा परिस्थितीमध्ये नगर जिल्ह्यात संपूर्ण विखे गट आता राष्ट्रवादीविरोधात एकवटला आहे.
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील जागा राष्ट्रवादीने सुजय विखेंसाठी सोडली नाही आणि तिथूनच पुन्हा एकदा पवार विरुद्ध विखे संघर्ष पेटला. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन मी राष्ट्रवादी विरोधात प्रचार करणार, अशी भूमिका घेतली आणि ते मुलाचा छुपा प्रचार करू लागले. मात्र विखे पाटील विरोधी पक्षनेते असताना थेट भाजपच्या बैठकांमध्ये दिसू लागले. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत ते भाजपात जाणार अशा चर्चांना उधाण आलं, मात्र तसं झालं नाही. आता नगर दक्षिणची निवडणूक संपल्यानंतर विखे कुटुंब शिर्डी मतदारसंघात सक्रिय झालंय. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिर्डीत पत्रकार परिषदेत घेऊन विखेंचा राजीनामा स्वीकारल्याचं जाहीर केलं.
आधी नगर दक्षिण आणि आता शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीचं सत्र सुरू केलंय. पक्षाविरोधात त्यांनी भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. विखे समर्थकही जाहीरपणे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना पाडण्याची भाषा करत आहेत.
शिर्डी येथे राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. विखे पाटील या बैठकीस आवर्जून उपस्थित होते. या बैठकीचं चित्रीकरण करण्यास प्रसार माध्यमांना रोखण्यात आलं. बैठकीनंतर बोलताना विखे पाटलांनी आपली भूमिका 27 एप्रिलला जाहीर करण्याचं सांगितलं.
राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटलांनी थोरातांच्या बालेकिल्ल्यात बैठकींचं आणि मेळाव्यांचं सत्र सुरू केलं आहे. संगमनेरमध्ये सुजय यांनी पाच छोट्या-मोठ्या सभा घेत थोरातांवर टीकेची झोड उठवली. युतीचं प्रामाणिकपणे काम करा, पाच वर्षात घड्याळ आणि पंजा हद्दपार करू, असं भाष्य सुजय यांनी संगमनेरातील सभेत केलं. तसेच वडिलांनाही इकडे आणायचा प्रयत्न करतोय, असं वक्तव्य सुजय विखे यांनी केलं. लवकरच राधाकृष्ण विखे पाटील भाजपात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. दक्षिणेत विखे – पवार, तर शिर्डी लोकसभेत विखे – थोरात असा राजकीय संघर्ष आहे. विखे-थोरातांच्या लढाईत कोण बाजी मारतं हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. त्यातच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिल्याने थोरात गटाला मोठा थक्का बसलाय. त्यामुळे आता येत्या काळात राधाकृष्ण विखे पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.