राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जातंय. मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणूम राजीनामा देणार […]
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जातंय. मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणूम राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधीही या बैठकीसाठी उपस्थित होत्या. काँग्रेस नेतृत्त्वापर्यंत राधाकृष्ण विखेंनी त्यांचं गाऱ्हाणं मांडल्याची माहिती आहे. यानंतरही सुजय विखे भाजपप्रवेशावर ठाम आहे. सुजय विखेंनी राष्ट्रवादीनेही स्वतःच्या तिकिटावर लढण्याची ऑफर दिली होती.
राधाकृष्ण विखे पाटील नाराज
विखे आणि पवार यांच्यातील वाद जुना आहे. हाच वाद लक्षात घेत शरद पवार यांनी सुजयसाठी ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला. शरद पवार हे आम्हाला पितृतुल्य असून त्यांना सुजयला नातू समजून संधी द्यावी, असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं होतं. पण पवारांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत जुन्या संघर्षाचा दाखला दिल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आणखी नाराज झाल्याचं बोललं जातंय.
सुजय विखेंचा भाजप प्रवेश निश्चित
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. अहमदनगरच्या राजकारणात या निमित्ताने मोठी घडामोड होणार आहे. डॉ. सुजय विखे हे उद्या म्हणजे मंगळवारी दुपारी 12 वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपात प्रवेश करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणार यात काही शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गांधी समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं, मात्र आता वेळ निघून गेल्याने कोणताही उपयोग नाही.
भाजप प्रवेशाअगोदर 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यात सुजय विखे आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ठीक 12 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सुजय विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तसेच नगरच्या काही निवडक कार्यकर्त्यांना आज रात्री मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विखेंकडून मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं जाण्याचीही शक्यता आहे.