सरकारने जनतेला विश्वासघाताचा शॉक दिलाय, विखे पाटलांंकडून वीज बिलांची होळी
भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आज नगरमधल्या लोणी येथे वीज बिलांची होळी करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
शिर्डी : भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आज नगरमधल्या लोणी येथे वीज बिलांची होळी करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वीज बिलांची होळी करण्यात आली. (Radhakrishna Vikhe patil Slam mahavikas Aaghadi Government over Excessive Electricity bill)
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं तसंच वीज बिलांची होळी केली. 100 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा करून सरकारने जनतेला विश्वासघाताचा शॉक दिलाय, अशी घणाघाती टीका विखे पाटलांनी ठाकरे सरकारवर केली.
वाढीव वीज बिल केवळ भाजपाच्या आंदोलनाचा विषय नाही तर वाढीव विज बिलाविरोधात रोष व्यक्त करत राज्यातील जनता देखील रस्त्यावर उतरली आहे.स्वत:चे अपयश झाकण्यासाठी मागच्या सरकारवर केवळ दोषारोप सुरु आहे. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी असल्याची टीका विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
“वाढीव वीज बिलावरुन राज्यात वणवा पेटलेला आहे. सरकारने आम्हाला फसवलंय, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे. लॉकडाऊन काळात सरकारने 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. सरकारकडे कुणीही मोफत वीज देण्याची मागणी केली नव्हती. मात्र सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्याच्या नादात सरकारने घोषणा केली पण ज्या घोषणेची अंमलबजावणी होणार नाही, अशी घोषणा केली. सरकारने आता कोणत्याही परिस्थितीत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करावी”, अशी मागणी विखे यांनी केली.
वीज कापायला आले तर भाजप कार्यकर्ते झेंडे घेऊन विरोध करणार- बावनकुळे
नागपुरात माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले असून ते ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांसह वीजबिलांची होळीसुद्धा केली आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले की, “कोट्यवधी जनता वाढीव वीजबिलामुळे भरडलेली आहे. या सरकारनं वीजबिल माफ केलं नाही, म्हणून आम्ही वीजबिलांची होळी केली. महाराष्ट्रात 2 हजार ठिकाणी वीजबिलांची होळी होणार आहे. तरीही सरकार ऐकलं नाही आणि कोणी वीज कापायला आले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन त्यांना विरोध करतील”.
(Radhakrishna Vikhe patil Slam mahavikas Aaghadi Government over Excessive Electricity bill)
संबंधित बातम्या
वाढीव वीज बिलांविरोधात आमदार कालिदास कोळंबकर आक्रमक, नायगावात वीज बिलांची होळी
सरकार पलटलं, वाढीव वीजबिलामुळे जनता भरडली; बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
वीजबिले जबरदस्तीने वसूल करणारी ठाकरे सरकारची ही जुलमी राजवट; प्रवीण दरेकरांचा सरकारवर घणाघात