मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात देवेंद्रजी…
राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) कधी होणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच प्रश्नावरून विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतका वेळ का लागत आहे? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या यापूर्वीच्या विस्ताराला देखील विलंब झाला होता. तेव्हाही विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार करधी होणार? यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार कधी होणार याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींना आहे. तेच याबाबत निर्णय घेतील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले विखे पाटील?
दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता होती. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हे ठरवण्याचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींनाच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील. देवेंद्रजींनी सांगितलं की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
विरोधकांकडून टीका
दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधक राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. सरकार अस्थिर असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला मंत्रिपद हवं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्याची टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. तर जोपर्यंत बहुमत आहे, तोपर्यंत सरकार सत्तेत राहील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.