Rahul Gandhi | ब्रिटनमधून राहुल गांधी यांचा गंभीर आरोप, माझ्या फोनमध्ये हेरगिरी करणारे पेगासस होते.. काय घडतंय?
लंडनमधील नावाजलेल्या केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांनी भारतातील केंद्र सरकारवर हे गंभीर आरोप केलेत.
लंडन : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ब्रिटनमध्ये भाषण करताना मोठा दावा केला आहे. माझ्या फोनमध्ये पेगासस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर आले होते. फक्त माझ्याच नव्हे तर भारतातील इतर अनेक नेत्यांच्या फोनमध्येही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले होते.भारतात लोकशाही धोक्यात आहेत. अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. एवढंच नाही तर सरकारने सर्वच संस्थांवर ताबा घेतलाय. माध्यम आणि कोर्टावरही सरकारने कब्जा केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय. लंडनमधील नावाजलेल्या केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांनी भारतातील केंद्र सरकारवर हे गंभीर आरोप केलेत.
Large number of poltical leaders have Pegasus on their phone. I myself had Pegasus on my phone. I’ve been called by Intelligence officers who say please be careful of what you say on phone as we are recording the stuff:Cong leader Rahul Gandhi at Cambridge University
(file pic) pic.twitter.com/PqsKEEaJDo
— ANI (@ANI) March 3, 2023
गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली माहिती…
राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. तेथील केम्ब्रिज बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, मला गुप्तहेर अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली. माझा फोन रेकॉर्ड केला जातोय. फक्त मीच नव्हे तर देशातील अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्येही पेगासस सॉफ्टवेअर लावण्यात आले आहे. विरोधी नेत्यांचे फोन टॅप केले जातायत. मी न केलेल्या गुन्हांवरून खटले दाखल करण्यात आले. पण अशाही स्थितीत आम्ही बचाव करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. त्यांना खोट्या केसमध्ये फसवलं जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
‘लोकशाही धोक्यात’
काँग्रेस नेते सॅप पित्रोदा यांनीही राहुल गांधी यांचा केम्ब्रिज विद्यापीठातील भाषणाचा व्हिडिओ ट्विट केलाय. या व्हिडिओत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा, भारतीय लोकशाही, माध्यमं, न्यायपालिका यासारख्या विषयांवर भाष्य केलंय. राहुल गांधी यांनी केम्ब्रिज विद्यापीठात ‘लर्निंग टू लिसनिंग’ म्हणजेच ऐकण्याची कला शिकणं यावर भाषण केलं. यावेळी त्यांनी पेगासस विषयी दावा केला. माझा फोन रेकॉर्ड केला जातोय, असं गुप्तहेरांनी मला सांगितलं. काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यानचा एक किस्सा राहुल गांधी यांनी सांगितला. माझ्याकडे एकजण आला. काही लोकांकडे बोट दाखवून तो म्हणाला, ते उग्रवादी आहेत. मी त्यांच्याकडे बारकाईनं पाहिलं. त्यांनीही माझ्याकडे पाहिलं. पण ते काही करू शकले नाहीत. ऐकण्याची कला आणि अहिंसेत ही ताकद आहे, असं राहुल गांधी भाषणादरम्यान म्हणाले.