नवी दिल्ली : चीनबरोबर वाढत्या तणावाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला. मोदींनी बीजिंगला ‘शरण’ गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर’ मोदी आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली. (Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)
‘जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी हे खरं तर सुरेंदर मोदी आहेत’ असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. नरेंद्र या नावाशी साधर्म्य असलेले ‘सुरेंदर’ (Surender) असे नाव त्यांनी लिहिले असले, तरी सरेंडर (Surrender किंवा शरणागती) या अर्थाने ते लिहिल्याचे बोलले जाते. ‘चीनबाबत भारताचे तुष्टीकरण धोरण उलगडले’ या विषयावर ‘जपान टाईम्स’मध्ये लेख आहे.
Narendra Modi
Is actually
Surender Modihttps://t.co/PbQ44skm0Z
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 21, 2020
राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधानांवर चिनी आक्रमणास ‘शरण गेल्याचा’ आरोप केला होता. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली होती. चीनने भारताच्या जमिनीवर घुसखोरी केली नसल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत केला होता. गलवानच्या खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले.
हेही वाचा : गलवान खोऱ्यात चिनी घुसखोरीवरुन काँग्रेसचे प्रश्न, पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण
पंतप्रधानांनी चीनच्या आक्रमकतेनंतर भारतीय भूमी सोपवली. जर चीनची ती भूमी असेल, तर आपले जवान कसे शहीद झाले? आणि हे जवान कुठे शहीद झाले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास करुन, त्यांची विधाने मोडतोड करुन आरोप केले जात आहेत, असं पीएमओने त्यानंतर स्पष्ट केलं. लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC) वर भारतीय सैन्याच्या 16 बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चीनचा डाव उधळून लावला. त्यामुळेच चीनला आपल्या सीमेत घुसता आलं नाही, असंही पीएमओने स्पष्ट केलं. (Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)