मोदी जी, इस कठिन समय में मेरा प्यार तुम्हारे साथ है… राहुल गांधी असं का म्हणाले?
राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेदरम्यान पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्लीः भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेतून संपूर्ण देशभरात भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अचानक एक वक्तव्य केलंय. मोदी जी इस कठिन समजय में मेरा प्यार तुम्हारे साथ है, असं ट्विट राहुल गांधींनी केलंय. कारणही तसंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आई हीराबेन मोदी (Hiraben Modi) यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यामुळे राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवत राहुल गांधी यांनी त्यांच्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
राहुल गांधी यांचं ट्विट काय?
आई आणि मुलामधलं प्रेम अनंत आणि अनमोल असतं. त्यामुळे अशा कठीण काळात माझं प्रेम आणि शुभकामना तुमच्यासोबत आहेत. तुमच्या आई लवकर ठीक व्हाव्यात अशी प्रार्थना करतो, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.
एक मां और बेटे के बीच का प्यार अनन्त और अनमोल होता है।
मोदी जी, इस कठिन समय में मेरा प्यार और समर्थन आपके साथ है। मैं आशा करता हूं आपकी माताजी जल्द से जल्द स्वस्थ हो जाएं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2022
अहमदाबादेत उपचार सुरू…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या प्रकृतीत बुधवारी अचानक बिघाड झाला होता. त्यांना अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोलॉजी अँड रिसर्च सेंटर येथे त्यांना भरती करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
आईच्या प्रकृतीची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादेत दाखल झाले होते. रुग्णालयात पोहोचून त्यांनी आईच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सध्या हीराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर असून पुढील एक-दोन दिवसात त्यांना घरी सोडण्यात येईल , अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
हीराबेन मोदी यांच्या प्रकृतीची बातमी कळल्यानंतर कालपासूनच गुजरातमधील नेत्यांची गर्दी रुग्णालयाबाहेर जमू लागली. एकानंतर एक अशा अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेट दिली.
राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी, आंतराराष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही मोदी यांच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.
हीराबेन यांचा रक्तदाब, टू डी इको आणि सिटी स्कॅन रिपोर्ट नॉरर्मल आला आहे. पुढील काही तास त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाईल. गुरुवारी दुपारपर्यंत हॉस्पिटलकडून मेडिकल बुलेटिन जारी केलं जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांनी नुकतंच १०० व्या वर्षात पदार्पण केलंय. मोदी यांनी त्यांच्या नात्यावर नुकताच एक ब्लॉग लिहिला. प्रत्येक वाढदिवसाला मोदी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलाय.