मकरसंक्रांतीला आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या भेटीला, राजकीय ‘पतंगबाजी’ला उधाण
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे.
नवी दिल्ली : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीत एकमेकांची भेट घेतली आहे. राहुल गांधींच्या निवासस्थानी ही भेट (Rahul Gandhi Meets Aditya Thackeray) झाली आहे. दोघांच्या भेटीचं नेमकं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. याआधी, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचं निमंत्रण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यासाठी खुद्द आदित्य ठाकरे दिल्लीला गेले होते. परंतु त्यावेळी राहुल आणि आदित्य यांची भेट झाली नव्हती.
आदित्य ठाकरे हे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. कालच त्यांनी फेसबुक-इन्स्टाग्रामच्या हेडकॉर्टरला भेट देऊन कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या होत्या.
ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळीही आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट झालेली नव्हती. महाराष्ट्रातील सत्तेची घडी व्यवस्थित बसल्यानंतर आता या दोन नेत्यांची भेट एकमेकांच्या भुवया उंचावणारी आहे.
काय चर्चा होऊ शकते? – महाराष्ट्रात आज मकर संक्रांतीचा उत्साह आहे. महाराष्ट्रातील परंपरेनुसार तिळगुळ वाटून आदित्य ठाकरे-राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल माहिती देऊ शकतात.
– महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यादृष्टीने राजकीय चर्चा होणं साहजिक आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थितीचा आढावा राहुल गांधी घेऊ शकतात.
– राजधानी दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यादृष्टीने आदित्य ठाकरे-राहुल गांधी यांच्यात चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
– आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आहेत. त्यामुळे त्याबाबतही चर्चा होऊ शकते.
Rahul Gandhi Meets Aditya Thackeray