अंबानींना नेमका फायदा किती? राहुल गांधींचे एकाच सभेत दोन आकडे
नांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान करारात उद्योगपती अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपये दिले, ही यांची चौकीदारी अशी, टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मात्र थोड्या वेळानंतर राफेल कराराबाबत बोलताना राहुल गांधींचा आकडा पुन्हा बदलला. अनिल अंबानीला जर ’35 हजार कोटी’ दिले जाऊ शकतात, तर मग आपण […]
नांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान करारात उद्योगपती अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपये दिले, ही यांची चौकीदारी अशी, टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मात्र थोड्या वेळानंतर राफेल कराराबाबत बोलताना राहुल गांधींचा आकडा पुन्हा बदलला. अनिल अंबानीला जर ’35 हजार कोटी’ दिले जाऊ शकतात, तर मग आपण गरिबांना किती देऊ शकतो, असे विचारले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्या नांदेडच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेतून मोदी सरकार पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मी मोदींसारखी खोटी आश्वासनं देणार नाही, आमचं सरकार स्थापन होताच 22 लाख सरकारी नोकऱ्यांची तात्काळ भरती करणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.
तसेच पाच वर्षांपासून सरकार चालवणाऱ्या नरेंद्र मोदींनी जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स लावला. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. तसेच मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार आणि शेतीला हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात सर्व जनतेची फसवणूक झाली, अशी टीकाही राहुल गांधींनी केली.
राफेल विमान करारावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकार श्रीमंताचे पैसे माफ करु शकतं, अनिल अंबानीचे पैसे माफ होऊ शकतात, तर तुमच्या खात्यात 72 हजार का जमा होऊ शकत नाहीत, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात सर्वसामान्यांवर अन्याय केला आहे. मात्र काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सामान्यांना न्याय देईल, असं ते म्हणाले.
एका चौकीदाराने सगळ्या चौकीदारांना बदनाम केलंय. नरेंद्र मोदी यांनी माझ्याबरोबर आमने-सामने चर्चा करावी. मी त्यांना राफेलसंदर्भात दोन तीन प्रश्न विचारु इच्छितो. पण चौकीदार घाबरतो, असेही राहुल गांधी म्हणाले. सगळ्या चोरांची नावं मोदी असल्याची टीकाही राहुल गांधींनी केली.
पाहा व्हीडिओ: राहुल गांधींचं संपूर्ण भाषण