“शिवसेनेच्या आमदारांना 50 कोटी रुपये देऊन फोडलं”, राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उघडपणे सांगितलं…
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय...
अकोला : मला आता शिवसेनेचे एक आमदार (Shivsena MLA) भेटले. ते सांगत होते की, भाजप आणि शिंदेगटाने आमदारांना कसं फोडलं ते. 50 कोटी रुपये देऊन आमदारांना फोडल्यांचं त्यांनी सांगितलं. त्या आमदारालाही 50 कोटीची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती नाकारली. ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले, असं म्हणत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आमदारांना ऑफर केलेल्या पैशांवर भाष्य केलं. ते अकोल्यात बोलत होते.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रा अकोल्यात आहे. अकोल्यात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. तेव्हा त्यांनी शिवसेनेतील आमदार कसे फुटले यावरही भाष्य केलंय.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत याआधी बोलताना विनायक सावरकरांबाबत विधान केलंय. यात सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. त्यावर आक्षेप घेण्यात आलाय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपला आक्षेप नोंदवला आहे.फडणवीस यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीत गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.
फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देताना राहुल गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधीनी एक पत्र वाचून दाखवलं. “मै आपका नौकर रहना चाहता हूँ, असं पत्र विनायक सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलं होतं. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. तर या पत्रात तसा मजकूर आहे. देवेंद्र फडणवीसयांना हे पत्रं वाचायचं असेल तर ते वाचू शकतात”, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फडणवीसांवर पलटवार केलाय.