सत्ता आल्यानंतर चौकीदारांना तुरुंगात टाकू, नागपुरात राहुल गांधींची धमकी
नागपूर : सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची चौकशी करु, ते कुठल्याच घोटाळ्यातून सुटू शकणार नाहीत, चौकीदारांना तुरुंगात टाकू, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील उमेदवारांसाठी आज नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसने 14 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आणि मोदी सरकारने पाच वर्षांत […]
नागपूर : सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची चौकशी करु, ते कुठल्याच घोटाळ्यातून सुटू शकणार नाहीत, चौकीदारांना तुरुंगात टाकू, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील उमेदवारांसाठी आज नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
काँग्रेसने 14 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आणि मोदी सरकारने पाच वर्षांत कोट्यावधी लोकांना पुन्हा गरिबीत ढकललं, असा आरोप राहुल गांधींनी मोदींवर केला. ‘आमचं सरकार आल्यावर सर्वांत पहिले गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करु’, अशी घोषणा राहुल गांधी यांनी यावेळी दिली. देशातील 5 कोटी कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपयांची घोषणा आम्ही घाईगडबडीत केली नाही. तज्ज्ञांनी अभ्यास केल्यानंतरच काँग्रेसने देशाला हे वचन दिलं.
अनिल अंबानी, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी हे मोदींचे भाई
“अर्जुनाला जसा माश्याचा फक्त डोळा दिसला, तसं 5 वर्षांत 3 लाख 60 हजार रुपये गरिबांना देण्याचं लक्ष्य माझ्या डोळ्यापुढे आहे. आम्ही घोषणा केल्यावर पैसा कुठून आणणार, असा प्रश्न भाजपवाले करत आहेत. तर अंबानी, नीरव मोदी आणि मल्ल्याच्या खिशातून हे पैसे येतील, हेच आमचं उत्तर आहे”, असंही ते म्हणाले. संरक्षण विभागाचा कुठलाही संबंध नसताना राफेलचा कॉन्ट्रॅक्ट अनिल अंबानीला देण्यात आला. या कामाचा कुठलाही अनूभव आणि कुठलेही ज्ञान नसताना अंबानीला जगातील सर्वांत मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला. त्यापेक्षा विदर्भातील एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला दिला असता तर चालले असते. मोदींसाठी अनिल अंबानी, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी हे भाई आहेत. ते अंबानीचे कर्ज माफ करु शकतात. मात्र, शेतकऱ्याचे नाही, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
विदर्भातील शेतकऱ्याचा माल अमेरिका, इंग्लंड, जपान आणि चायनातील सुपर मार्केटमध्ये विकला जावा, असे मला वाटते. प्रत्येकवेळी मेड इन जपान, मेड इन चायना दिसण्यापेक्षा ‘मेड इन विदर्भ’ चायनामध्ये दिसावे, यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
नोटाबंदीचा पैसा देशाबाहेर गेला
मोदींनी नोटाबंदी करण्यापूर्वी बारा वर्षांच्या मुलाला आपली कल्पना सांगितली असती, तर त्यानेही नकार दिला असता. पण, नरेंद्र मोदींना ते लक्षात आलं नाही. नोटाबंदीचा संपूर्ण पैसा देशाबाहेर गेला. ‘मेक इन इंडिया’सारखी कल्पना मला मनापासून आवडली होती. पण, तिथेही मोदींनी अंबानी आणि अदानींनाच फायदा करुन दिला.
मोदींनी माझ्यासोबत 15 मिनिटं चर्चा करावी : राहुल गांधी
“नरेंद्र मोदींसोबत मी चर्चेला तयार आहे. संपूर्ण देशापुढं त्यांनी पंधरा मिनिटं माझ्यासोबत चर्चा करावी. भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी गेल्या पाच वर्षांत मोदींनी काय केलं ते सांगावं. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना मोदी चेहरा दाखवू शकणार नाही”, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
“ज्येष्ठांचा आदर व्हायला हवा, मात्र अडवाणींची अवस्था बघून मोदींची ती वृत्ती असल्याचं दिसत नाही. गुरुपुढे नतमस्तक होण्याइतकीही सभ्याता त्यांच्यात नाही. हा कुठला हिंदू धर्म?”, असा सवालही त्यांनी केला.
महिलाच देशाच्या पाठिचा कणा : राहुल गांधी
“जाहीरनाम्यात 72 हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा आम्ही केली. हे पैसे 5 कोटी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. कारण, महिलाच देशाच्या पाठिचा कणा आहे. या शक्तीला बळकट करण्यासाठी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेसह सर्व सभागृहांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ”, असं आश्वासनही राहुल गांधींनी यावेळी दिलं.
राहुल गांधी यांच्या सभेला कस्तुरचंद पार्क हे मैदान निवडण्यात आलं या ठिकाणी सभेला बऱ्यापैकी गर्दी असली तरी राहुल गांधींच्या सभेला ती गर्दी कमीच वाटत होती.