अखेर अध्यक्षपदावरुन पायउतार, राहुल गांधींचं 4 पानी पत्र जसंच्या तसं
राजीनामा शेअर करताच त्यांनी ट्विटरवर त्यांचं पक्षातील पद अध्यक्ष याऐवजी सदस्य असं केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देत असून पक्षाने लवकर नवा अध्यक्ष शोधावा, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली : काँग्रेसला अखेर नवा अध्यक्ष शोधावा लागणार आहे. कारण, विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी चार पानांचं पत्र लिहित राजीनामा ट्विटरवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे राजीनामा शेअर करताच त्यांनी ट्विटरवर त्यांचं पक्षातील पद अध्यक्ष याऐवजी सदस्य असं केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देत असून पक्षाने लवकर नवा अध्यक्ष शोधावा, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.
राहुल गांधींचं पत्र
देशाच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेल्या काँग्रेसचं नेतृत्त्व करणं हा माझ्यासाठी सन्मान होता. पक्ष आणि लोकांनी दिलेल्या प्रेमाचा मी कायम ऋणी राहिल. अध्यक्ष म्हणून या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी माझी आहे. पक्षाच्या वाढीसाठी मूल्यमापन अत्यंत महत्त्वाचा असतं. हेच कारण लक्षात घेत मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असंही राहुल गांधींनी म्हटलंय.
“पक्षाकडूनच नवा अध्यक्ष निवडला जावा”
पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागत असतात आणि या पराभवाला काही जणांनी तरी उत्तरदायी असणं गरजेचं आहे. पराभवासाठी इतरांना जबाबदार धरुन अध्यक्ष या नात्याने मी स्वतःकडे दुर्लक्ष करणं हा इतरांवर अन्याय असेल. काँग्रेसचा नवा अध्यक्ष तुम्हीच सुचवा असं पक्षातील माझ्या अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं. पण पक्षाचं नेतृत्त्व करण्यासाठी नव्या चेहऱ्याची गरज आहे आणि मी हा व्यक्ती निवडणं बरोबर नाही. आपल्या पक्षाला मोठा इतिहास आणि परंपरा आहे आणि त्याचा मी आदर करतो. त्यामुळे मला पक्षावर पूर्ण विश्वास आहे की देशहित लक्षात घेऊन योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. राजीनामा देताच काँग्रेस कार्यकारिणीतील सदस्यांना स्पष्ट केलं की नवा अध्यक्ष निवडणं हे आव्हान असेल. पण त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असेल, असंही त्यांना स्पष्ट केलंय.
भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल
माझी लढाई सत्तेसाठी कधीच नव्हती. भाजपसोबत मला कसलाही राग किंवा द्वेष नाही. पण माझी त्यांच्यासोबत विचारधारेची लढाई आहे आणि हा नवीन विषय नाही. विचारांची लढाई ही आपल्या देशात हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. पण सध्या आपल्या संविधानावर जो घाला घातला जातोय, ती देशाची रचना उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने वाटचाल आहे. पण मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. मी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक आहे आणि देश वाचवण्यासाठी हा संघर्ष कायम चालूच असेल, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवरही हल्लाबोल केलाय.
“निवडणुका पारदर्शक होणं गरजेचं”
सर्वधर्म समभाव ही आपल्या निवडणुकीची परंपरा आहे. वैयक्तिकपणे मी पंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी लढलो, कारण तिथे देशाचा प्रश्न होता. देश ज्या तत्वांवर उभा आहे, ते तत्व वाचवण्यासाठी मी लढलो. त्यावेळी मी पूर्णपणे एकटा होतो आणि त्याचा मला अभिमान आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षातील सदस्यांकडून मी अनेक गोष्टी शिकलो. पारदर्शी निवडणूक होण्यासाठी देशातील संस्था अबाधित राहण्याची गरज आहे. मीडियाचं स्वातंत्र्य, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आणि पारदर्शी निवडणूक आयोग हेच पारदर्शकपणाचं उद्दीष्ट असतं. पण आर्थिक स्रोतांवर जर एकाच पक्षाचं वर्चस्व असेल तर पारदर्शी निवडणूक कुणीही करु शकत नाही, असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवरही संशय व्यक्त केलाय.
लोकसभा निवडणूक आम्ही एक पक्ष म्हणून नव्हे, तर एक देश म्हणून लढलो. पण सर्व संस्था विरोधकांविरोधात एकवटलेल्या होत्या. त्यामुळे हे स्पष्ट आहे की एकेकाळी प्रतिष्ठित असलेल्या संस्थेचा प्रामाणिकपणा देशात सध्या उरलेला नाही. आरएसएसचं ठरलेलं उद्दीष्ट, संस्थांवर ताबा मिळवणं हे आता पूर्ण झालंय. आपली लोकशाही मूलभूतदृष्ट्या कमकुवत झाली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात खरा धोका आहे. यामुळे देशातील प्रत्येकाचं भविष्य धोक्यात येणार आहे. आपले पंतप्रधान त्यांच्याविरोधात भ्रष्टाचारावर चकार शब्दही काढत नाहीत. देशातील संस्था वाचवण्यासाठी देशाने नक्कीच एकत्र यायला हवं आणि देशाला एकत्र आणण्याचं एकमेव माध्यम काँग्रेस पक्ष आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.
महत्त्वाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची गरज आहे. भाजपकडून आज जनतेचा आवाज दाबला जातोय. देश वाचवणं हे काँग्रेसचं कर्तव्य आहे. देशात एक आवाज कधीच नव्हता आणि तो कधीच नसेल. कारण, लोकशाहीमध्ये कायम प्रत्येकाचं मत वेगळं असतं आणि तिच आपल्या देशाची ओळख आहे, असं म्हणत राहुल गांधींनी सर्वांचे आभार मानले आहेत.
It is an honour for me to serve the Congress Party, whose values and ideals have served as the lifeblood of our beautiful nation.
I owe the country and my organisation a debt of tremendous gratitude and love.
Jai Hind ?? pic.twitter.com/WWGYt5YG4V
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2019