Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात, 18 दिवसांच्या यात्रेचे असे असणार स्वरूप
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. महाराष्ट्रात पुढचा प्रवास कसा असणार आहे जाणून घेऊया.
मुंबई, काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. सोमवारी रात्री तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ही यात्रा पोहोचली. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) मशाल घेऊन पुढे सरसावले. भारत जोडो यात्रा 18 दिवसांच्या मुक्कामात राज्यातील 15 विधानसभा मतदारसंघ आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. ही यात्रा मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागातून जाणार आहे. दरम्यान, राहुल गांधी महाराष्ट्रात दोन जाहीर सभांनाही संबोधित करणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडी यात्रा महाराष्ट्रात एकूण 18 दिवस चालणार आहे. 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान राहुल गांधी पाच जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढणार आहेत. या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी 7 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यात असतील, त्यानंतर ते 11 ते 15 नोव्हेंबरपर्यंत वाशिम जिल्ह्यात राहणार आहेत.
उद्धव ठाकरे होऊ शकतात सामील
यादरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी महाराष्ट्रात दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत, ज्यामध्ये पहिली जाहीर सभा 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये आणि दुसरी 18 नोव्हेंबरला शेगावमध्ये होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे 9 किंवा 10 नोव्हेंबरला काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सामील होऊ शकतात. त्याचबरोबर 10 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहुल गांधी यांच्या जाहीर सभेलाही उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकतात.
महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी या यात्रेने सुमारे 375 किलोमीटर अंतर कापले आहे. 7 सप्टेंबर रोजी दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही पदयात्रा 61 व्या दिवशी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. यात्रेतील सहभागींसाठी देगलूर येथील कलामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. स्वागत समारंभानंतर सोमवारी रात्री यात्रेला पुन्हा सुरुवात झाली असून त्यात कार्यकर्ते ‘एकता मशाल’ घेऊन जाणार आहेत.